मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधी मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही…”
![मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधी मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, "आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही..." manoj jarange 1 1](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/09/manoj-jarange-1-1-780x470.jpg)
जालना | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जालन्यात (Jalna) येऊन भेट घ्यावी, अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) घातली होती. तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगेंची ही मागणी मान्य केली आहे. कालच ते जालन्यात जाणार होते पण काही कारणांमुळे त्यांना जाणं शक्य झालं नाही. त्यामुळे आज (14 सप्टेंबर) एकनाथ शिंदे जरांगेंची भेट घेणार आहेत.
सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालन्यासाठी रवाना झाले आहेत. ते 11 च्या सुमारास आंतरवाली सराटी गावामध्ये दाखल होतील. तसंच मुख्यमंत्र्यांसोबत अजित पवार, रावसाहेब दानवे, संदीपान भुमरे, राधाकृष्ण विखे पाटील देखील जरांगेंची भेट घेण्यासाठी जाणार आहेत. तर आता मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर उपोषण सोडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशातच आता मुख्यंमंत्र्यांच्या भेटीआधी मनोज जरांगेंनी मोठं वक्तव्य केलं आहे.
यावेळी मनोज जरांगे म्हणाले, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटायला येत आहेत. त्यामुळे आता आरक्षण मिळेल की नाही याबाबत आत्ताच सांगता येणार नाही. पण, आरक्षण घेतल्याशिवाय मी सोडणार नाही, हेचं उत्तर आत्ता माझ्याकडे आहे. तसंच मी मुख्यमंत्र्यांसोबत बंद खोलीत कसलीही चर्चा करणार नाही. सगळी चर्चा माध्यमांसमोरच करणार आहे. समाजासमोरच सर्व काही घडणार आहे.