अंधेरीतील इमारतीला भीषण आग; दोन ज्येष्ठ नागरिक आणि एका कर्मचाऱ्याचा होरपळून मृत्यू

मुंबईतील अंधेरी येथील रिया पॅलेस इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. लोखंडवाला येथील रिया पॅलेस ही १४ मजली इमारत आहे. या इमारतीच्या दहाव्या मजल्यावर लागलेल्या या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, या इमारतीच्या दहाव्या मजल्यावर दोन वृद्ध राहत होते. त्यांच्या घरामध्ये कामासाठी नोकर ठेवण्यात आला होता. या आगीमध्ये तिघांचा देखील मृत्यू झाला. सकाळी साडेआठच्या सुमारास मोठी आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चंद्रप्रकाश सोनी (७४ वर्षे), ममता सोनी (७४ वर्षे ) आणि त्यांचा नोकर पेलू बेटा ( ४२ वर्षे) यांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभरात या आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहेत. आग ही मोठ्या प्रमाणात लागली असल्याने परिसरात मोठा धूर पसरला. ओशिवरा पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून तपास केला जात आहे.