ताज्या बातम्यादेश - विदेश

मुंबईत ‘इंडिया’ची बैठक

मुंबई | INDIA Alliance Meeting आज (गुरुवार) मुंबईत विरोधकांच्या इंडिया (INDIA) आघाडीची बैठक होणार आहे. यासाठी देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांचे नेते मुंबईत दाखल झाले आहेत. अवघ्या देशाच्या नजरा या बैठकीकडे लागल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी ‘मविआ’ची एक संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या नेत्यांनी विरोधकांच्या बैठकीची रूपरेषा सादर करत केंद्राच्या स्वयंपाकाच्या गॅसचे दर कमी करण्याच्या निर्णयाचा खरपूस समाचार घेतला. याशिवाय राहुल गांधी, अखिलेश यादव, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह अनेक मोठे नेते मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. एकूण २८ पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.

बसपा स्वबळावर लढणार

भाजप विरोधात इंडिया आघाडीची बैठक मुंबईत होत आहे. याच दरम्यान बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.

इंडिया आघाडी आणि भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी ( एनडीए ) दोघेही गरीब विरोधी, भांडवलदारांचे समर्थक आणि जातीयवादी धोरणे राबविणारे आहेत, असा आरोप मायावती यांनी केला असून अशा आघाडयांशी युती करण्याचा प्रश्नच उदभवत नाही, असे त्या म्हणाल्या.

इंडिया आघाडीत बहुजन समाज पार्टी सहभागी होईल अशा चर्चा चालू असतानाच मायावती यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे भूमिका जाहीर करून टाकली. मायावती यांच्या स्वतंत्रपणे लढण्याच्या निर्णयाने भाजपला उत्तर प्रदेशातील राजकारणात दिलासा मिळाला आहे.

मायावती यांचे नेतृत्व मानणारा मतदार वर्ग भाजप विरोधातील आघाडीकडे जाणार नाही ही भाजपसाठी जमेची बाजू आहे. उत्तर प्रदेशात काही मतदारसंघात भाजप आणि इंडिया आघाडी यांच्यात चुरशीची लढत होईल अशा ठिकाणी बसपाचे स्वतंत्र अस्तित्व भाजपला फायदेशीर ठरणारे आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाची मतपेढी शाबूत ठेवून विधानसभा निवडणुकीत ताकदीने उतरावयाचे अशी रणनीती मायावती यांनी आखली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये