या वयातही तुम्ही ४० मिनिटे उभे होतात… MPSC परीक्षार्थींकडून पवारांचे कौतुक

मुंबई | एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढं नमतं घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं नवा अभ्यासक्रम व नवी परीक्षा पद्धती 2025 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास सहा महिन्यांच्या यशस्वी लढ्यानंतर परीक्षार्थींनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. “आमच्या मागण्यांना, आंदोलनाला आपण पाठिंबा दिलात. आमच्यामागे खंबीरपणे उभे राहिलात. रात्री 11 वाजता आमच्या आंदोलनस्थळी भेट देऊन आमच्या व्यथा जाणून घेतल्या, याबद्दल आपले आभार मानण्यासाठी आम्ही आज तुमच्या भेटीला आलोय”, असं परीक्षार्थींनी पवार यांना सांगितलं.
गेले काही महिने आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाला बसलेल्या एमपीएससी परीक्षार्थींच्या लढ्याला यश आलंय. एमपीएससी मुख्य परीक्षांमध्ये नवा पॅटर्न 2025 पासूनच लागू होईल, असा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिला. परीक्षार्थींना पाठिंबा देण्यासाठी दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार रात्री 11 वाजता पुण्यातील आंदोलनस्थळी गेले होते. त्यांच्या व्यथा-वेदना जाणून घेतल्या. आंदोलनस्थळावरुन त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करुन या प्रकरणी तातडीने लक्ष घालावी, अशी सूचना केली. मुख्यमंत्र्यांनीही एमपीएससी आयोगाला पत्र लिहिलं. त्यानंतर एमपीएससीने ट्विट करुन विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्याचं सांगितलं. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मोठा जल्लोष केला.
एमपीएससीच्या अभ्यास करणारे पुण्यातील परीक्षार्थी आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांची भेट घेतली. परीक्षार्थींच्या आंदोलनाला-मागण्यांना पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी पवारांचे आभार मानले. “आपण रात्री 11 वाजता आम्हाला भेटलात. या वयातही आपण तब्बल 40 मिनिटे उभे होतात. आमच्या व्यथा जाणून घेतल्या. इतर पुढारी पुण्यातील कसब्यात प्रचाराला आले अन् तिथून आमच्याकडे आले. आपण एकमेव होतात ज्यांनी फक्त आमच्यासाठी वेळ दिलात. आपले खरोखर आभार…”, अशा भावना परीक्षार्थींनी व्यक्त केल्या.