इथं तरी राजकारण नको…

-मधुसूदन पतकी
(स्व.) यशवंतराव चव्हाण यांनी राजकारण आणि सहकार क्षेत्र एकमेकांपासून पूर्णपणे बाजूला ठेवण्याचा सल्ला डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्यासमोर एका जाहीर कार्यक्रमात दिला होता.
राज्यातले नगदी आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे उत्पादन म्हणजे ऊस आणि साखर कारखाने आहेत. गणपती उत्सवानंतर नवरात्र आणि दसऱ्याचे वेध लागतात. दसऱ्याच्या मुहुर्तावर साखर कारखाने सुरु होतात. मोळी टाकली जाते आणि साखर उत्पादनाला प्रारंभ होतो.हा इव्हेंट आता मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन म्हणूनही साजरा होतो. साखर कारखाने वेळेत सुरु होणार अशी माहिती एका अनौपचारिक बातचितीत सरकारच्या वतीने ना. अतुक सावे यांनी दिली. या वर्षी उसाचे क्षेत्र वाढले आहे.त्यामूळे साखर कारखाने जास्तकाळ सुरु ठेवावे लागतील म्हणून कारखाने लवकर सुरु करण्याच्या विचारात सरकार आहे.त्यासाठी ॲप वापरले जाणार आहे.
खरे तर गेल्या तीन वर्षांपासून उसाचे लागवड क्षेत्र वाढत असल्याचे प्रत्येक सहकार मंत्री सांगत आला आहे. गेल्या दोन वर्षांत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी ऊस उत्पादनाच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे सांगितले. तसेच मे महिन्याच्या अखेरपर्यंत गेल्या हंगामात कारखाने सुरू राहतील असे स्पष्ट केले होते.
या वर्षी हंगामात राज्यात साधारणपणे १८० साखर कारखाने सुरू होणार असून अंदाजे ९५० ते एक हजारावर लक्ष टनावर उस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले जाऊ शकते. दोन वर्षांपूर्वींच्या हंगामात ते ८०० लाख टन होते, तर ऊस लागवडीचे क्षेत्र १२.३२ लाख हेक्टर होते. सुमारे ९७ टन प्रति हेक्टर उत्पादन त्या वेळी झाले. तर मागील वर्षी हे उत्पादन ११२ टन प्रतिटन झाले.
एकूण देशातच मोठ्या प्रमाणावर साखरेचे उत्पादन होत आहे. पुढे मुद्दा सुरु होतो तो निर्यात धोरणाचा. साखर किती निर्यात करायची आणि त्याचा फायदा कोणी मिळवायचा यावर मोठी चर्चा होते.टीकेचे केंद्रस्थान केंद्रसरकार असते आणि धोरण ठरवणारे केंद्रातले सरकार असल्याने ते साहजिकच आहे.मात्र निर्यात धोरण तसेच एफआरपी संदर्भातील धोरण आणि त्यावर अंमलबजावणी योग्य होणे आवश्यक आहे. ऊस, कापूस, कांदा या पिकांसंदर्भात अनेकदा आंदोलने आणि राडा पाहायला मिळातो. मात्र योग्य ते धोरण आखलेले पाहायला मिळत नाही. केंद्र सरकारने सहकार खाते निर्माण केले आहे व त्याचे मंत्री अमित शहा आहेत. एका दगडात ते अनेक पक्षी मारतील, मात्र राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून सहकार क्षेत्रासाठी कायमस्वरुपी यंत्रणा निर्माण केली पाहिजे. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी राजकारण आणि सहकार क्षेत्र एकमेकांपासून पूर्णपणे बाजूला ठेवण्याचा सल्ला डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या समोर एका जाहीरपणे दिला होता. मात्र आज त्याला काँग्रेसने फासलेला हरताळ अधिक गडद करण्याचे काम सगळेच कारखानदार करत आहेत. ऊसतोड कामगारांपासून कारखाना क्षेत्रात पंक्चर काढणाऱ्यापर्यंत आणि गावातल्या किराणा दुकादारापासून अंातरराष्ट्रीय पातळीपर्यंत एक आर्थिक यंत्रणा उभी असते. याचा राजकारणापलीकडे जाऊन विचार करून कृती करणे अपेक्षित आहे.