जर्मनीत जगभरातील सर्वाधिक रुग्ण

अमेरिकेत दोन दिवसांत २८ % वाढ
नवी दिल्ली : कोरोनाचे नवे रुग्ण अद्यापही जगातील काही देशांसाठी चिंतेचा विषय ठरले आहेत. जर्मनीत एका दिवसात जगातील सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून आली आहे. जर्मनीत बुधवारी १ लाख २४ हजार ८६३ नवे रुग्ण आढळून आले. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत हे प्रमाण ४३ टक्के जास्त आहे. जर्मनीत २५ एप्रिलला ८६ हजार ९८० नवे रुग्ण होते. अमेरिकेतही २५ एप्रिलला ४५ हजार ९१ नवे रुग्ण आढळून आले. २७ एप्रिलला नवे ५७ हजार ७३८ रुग्ण आढळले. ते पाहता वाढीचे प्रमाण २८ टक्के आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टर अँथनी फाउची यांनी बुधवारी आपला दावा स्पष्ट केला.
अमेरिकेतील महामारी अजून गेलेली नाही. त्याआधी अमेरिका महामारीच्या एका टप्प्यातून बाहेर आल्याचे विधान त्यांनी केले होते. न्यूयॉर्कमध्ये एका दिवसात सर्वाधिक ७ हजार ८४७ नवे रुग्ण आढळून आले. अमेरिकेच्या ३३ कोटी लोकसंख्येपैकी २० कोटी लोक बाधित झाले. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेडरॉड घेब्रिसस यांनी पुन्हा इशारा दिला आहे. कोरोना संसर्गाकडे कानाडोळा करणे जगासाठी घातक ठरेल. बुधवारी जगभरात कोरोनामुळे एका दिवसात सर्वाधिक १५ हजार ६६८ जणांचा मृत्यू झाला असतानाच घेब्रिसस यांनी हे वक्तव्य केले आहे. जगाने समस्येकडे गांभीर्याने पाहावे. चीनसह पूर्व आशियातील देशांत कोरोनाचे नवे रुग्ण वेगाने वाढू लागले आहेत.
दक्षिण कोरियात बुधवारी ७६ हजारांहून जास्त नवे रुग्ण आढळले. येथे आऊटडोर मास्कची अनिवार्यता पुन्हा लागू करण्यात आली आहे. जपानमध्ये गेल्या चोवीस तासांत ३८ हजारांहून जास्त नवे रुग्ण आल्यानंतर ओसाकामध्ये शाळा बंद करण्यात आल्या. नवी दिल्लीच्या विविध रुग्णालयांत कोरोना रुग्णांसाठी ९ हजार ३९० खाटांची उपलब्धता आहे. येथे केवळ १२९ रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. नवी दिल्लीत सक्रिय रुग्णांची संख्या सुमारे ५ हजारांवर आहे. देशात कोरोनाचे सक्रिय रुग्ण संख्या १६ हजार ९८० आहेत. भारतात गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे ३ हजार ३०३ नवे रुग्ण समोर आले आहेत.
बुधवारी कोरोनाची २ हजार ९३७ रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. गेल्या चोवीस तासांत ३९ जण मृत्युमुखी पडले. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ५ लाख २३ हजार ६९३ एवढी झाली. देशात पॉझिटिव्हिटी रेट ०.०४ टक्के आहे. गेल्या चोवीस तासांत २ हजार ५६३ रुग्ण बरे झाले. त्यामुळे आता कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ४,२५, २८,१२६ झाली आहे. रिकव्हरी रेट ९८.७४ टक्के आहे. देशभरात एकूण ४, ९७, ६६९ कोरोना तपासण्या झाल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.