हनुमान जयंतीला दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये हिंसाचार माजवणाऱ्यांना झाली ‘ही’ शिक्षा…

नवी दिल्ली : जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणी सुनावणी करताना रोहिणी कोर्टानं सोनू, सलीम, दिलशाद आणि अहिर यांच्यासह मुख्य आरोपी आणि एनएसए अटकेत असलेला अन्सार यांना 8 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याचबरोबर अन्य चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज एकूण 9 आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे. हनुमान जयंतीनिमित्त राजधानी दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये हिंसाचार झाला होता. याप्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यावर रासुका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या सर्व आरोपींवर गृह मंत्रालयानं आधीच एनएसए लावलं आहे. शनिवारी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं हिंसाचाराचे आरोपी सलीम चिकना, इमाम शेख उर्फ सोनू चिकना, दिलशाद आणि अहिर यांच्यासह 9 आरोपींची रोहिणी कोर्टात हजेरी लावली. न्यायालयासमोर युक्तिवाद केला की, हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळं अधिक चौकशी करणे बाकी आहे, जेणेकरून कटात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध घेता येईल. या प्रकरणाच्या तपासासाठी त्यांना पश्चिम बंगालसह अन्य ठिकाणी जावं लागेल, त्यामुळं चौकशीसाठी वेळ द्यावा, असं गुन्हे शाखेच्या वतीनं न्यायालयात सांगण्यात आलं.