संघ मोदींचाच प्रचार करणे शक्य

पुणे : विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि त्याअगोदर संघ सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केलेले भाष्य यांचे राजकीय क्षेत्रात पडसाद उमटू लागले आहेत. आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुकांचे पापक्षालन करायला हवे, जातिभेद मोडायला हवा, असे भाष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमीच्या मेळाव्यात बोलताना केले.
हे भाषण प्रसिद्ध करताना एका वृत्तपत्राने ‘ब्राह्मण’ या शब्दाचा उल्लेख भागवत यांच्या तोंडी घातल्याने वाद निर्माण झाला. ब्राह्मणांच्या काही संघटनांनी भागवतांचा निषेधही केला. भागवत यांनी भाषणात ब्राह्मण जातीचा उल्लेखही केला नव्हता, तरी ते वाक्य त्यांच्या तोंडी कसे काय घालण्यात आले, अशी विचारणा संघ समर्थकांनी केली. परंतु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अधिकृतपणे कोणतीही जाहीर प्रतिक्रिया दिलेली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भागवत यांच्या विधानाबद्दल समाधान व्यक्त केले. पण, तिरकस प्रतिक्रिया दिली. भागवत यांचे वक्तव्य ही समाधानाची बाब आहे. पण, समाजाच्या एका मोठ्या वर्गाला काही पिढ्या ज्या यातना सहन कराव्या लागल्या, त्या संदर्भातील जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्या घटकांना त्याची जाण व्हायला लागली आहे, असे पवार म्हणाले. नुसती माफी मागून चालणार नाही, तर तुम्ही या सगळ्याची दखल कशी घेता त्यावर सगळे अवलंबून आहे. अशीही पुस्ती पवार यांनी जोडली.
अन्य पुरोगामी संघटनांच्या, पक्षांच्या प्रतिक्रिया पवार यांच्या प्रतिक्रियेशी साधर्म्य दाखविणाऱ्या आहेत. भागवत यांच्या वक्तव्यावर अजूनही काही काळ पडसाद उमटत राहातील. अलीकडेच भागवत यांनी एका मदरशाला भेट दिली होती, त्यानंतर त्यांनी केलेले हे भाष्य, त्यामुळे पडसाद उमटत आहेत.
संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी समाजातील आर्थिक विषमता आणि बेरोजगारी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. देशातील ५० टक्क्यांहून अधिक लोकांचे उत्पन्न दिवसाकाठी ३७५ रुपयेही नाही आणि ही स्थिती चांगली नाही. देशात पुरेशा वैद्यकीय सेवाही उभ्या राहिलेल्या नाहीत, याविषयी होसबाळे यांनी चिंता व्यक्त केली होती. आर्थिक विषमता यावरही होसबाळे यांनी भर दिला होता.
जगाच्या पातळीवर भारताची आर्थिक स्थिती खूपच चांगली आहे, असा सरकारचा दावाही होसबाळे यांनी खोडून काढला. पंतप्रधान मोदी सरकारवरच होसबाळे यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. भाजपकडून उत्तर देण्यात आलेले नाही. परंतु, काँग्रेस पक्षाने होसबाळे यांचा मुद्दा उचलून धरलेला आहे. काँग्रेस पक्ष गेली तीन वर्षे हेच सांगतो आहे, संघाला त्याची उपरती आज झाली, अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाने दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या चालू असलेल्या त्यांच्या भारत जोडो यात्रेत होसबाळे यांचेच मुद्दे जोरकसपणे मांडत आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या काही धोरणांशी संघप्रणित स्वदेशी जागरण मंच, भारतीय मजदूर संघ सहमत नाहीत. भारतीय मजदूर संघाने मोदी यांच्या कामगार विषयक सुधारणांच्या विरोधात निदर्शनेही केली होती. लोकसभेची निवडणूक जवळ आली की, दोन वर्षे अगोदर मोदी यांना कानपिचक्या द्यावयाच्या आणि मोदींनी त्या अनुषंगाने काही सुधारणा करायच्या. प्रत्यक्ष प्रचारात संघ परिवाराने मोदींच्या पाठीशी उभे राहायचे, असे यापूर्वी २०१९ साली घडले. त्याचीच पुनरावृत्ती आत्ता २०२२ साली होत असल्याचे मत एका राजकीय अभ्यासकाने मांडले.