सूर-तालाच्या संगतीत पंडितजींची जन्मशताब्दी

मुंबई : भारतरत्न स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने दि. ९ व १० मे, २०२२ रोजी पुणे येथे शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे. गणेश क्रीडा, कला मंच येथे आयोजिलेल्या या महोत्सवात; पंडित हरिप्रसाद चौरसिया, आनंद भाटे यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार कला सादरीकरण करणार असल्याचेही अमित देशमुख यांनी नमूद केले आहे.
भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी संगीत महोत्सवाच्या पहिल्या पर्वात दि. ९ मे रोजी सायं. ६.०० वाजता पं. सारंगधर साठे व पं. प्रमोद गायकवाड यांची शहनाई व संवादिनी यांची जुगलबंदी सादर होणार आहे, तर त्याच दिवशी सायं. ७.०० वाजता विदुषी सानिया पाटणकर यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र पंडित श्रीनिवास जोशी यांचेदेखील शास्त्रीय संगीत गायन होणार आहे, तर त्यादिवशी रात्री ८.३० वाजता सुप्रसिद्ध बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे बासरीवादन सादर होईल.
महोत्सवाच्या दुसर्या पर्वात म्हणजेच दि. १० मे रोजी सायं. ६.०० वाजता पं. मारुती पाटील यांचे सतारवादन होईल, तर तद्नंतर श्रीमती शर्वरी जमेनीस व सहकारी यांचे सायं. ७.०० वाजता कथ्थक नृत्य सादरीकरण होईल. महोत्सवाची सांगता त्याच दिवशी रात्री ८.३० वा. पं. आनंद भाटे यांच्या गायनाने होणार आहे. सर्व रसिक-प्रेक्षकांसाठी हा संगीत महोत्सव विनामूल्य असून प्रथम येणार्यास प्रथम तत्त्वावर आसनव्यवस्था निश्चित होणार असून, तरी सर्वांनी या महोत्सवाचा आनंद घेण्याचे आवाहन संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक, बिभीषण चवरे यांनी केले आहे.