विधानपरिषदेची उमेद्वारी नाकारल्यानं पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी केला धिंगाणा

औरंगाबाद – Maharashtra Legislative Council Election 2022 | नुकतीच राज्यसभेच्या निवडणुकांच्या (Rajyasabha Election 2022) हालचाली मंदावल्या असताना महाराष्ट्रात आता विधान परिषदेच्या निवडणूकींची हवा वाढली आहे. भाजपने (BJP Maharashtra) विधानपरिषदेच्या निवडणुकींसाठी आत्तापर्यंत पाच उमेद्वार उभे केले आहेत. मात्र यात पंकजा मुंडे यांचा समावेश असेल अशी त्यांच्या समर्थकांना अपेक्षा होती मात्र, भाजपकडून त्यांचे नाव वगळण्यात आल्याने समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नाराज पंकजा मुंडे यांचा समर्थकांनी औरंगाबाद मध्ये राडा घातला आहे. कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयावर आंदोलन करत भाजप विरोधात घोषणाबाजी केली आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागांत आंदोलन करण्यात आले आहे. जळगाव मध्येही मुंडे समर्थकांनी भाजपविरोधात आंदोलन करत घोषणाबाजी केली आहे. समाजमाध्यमांवरही नाराजी व्यक्त केली जात आहे.
पंकजा मुंडे यांना सातत्यानं डावललं जातंय असं मत समर्थकांनी व्यक्त केलं आहे. ओबीसी समाज येत्या निवडणुकांत भाजपला नक्कीच उत्तर देणारं अशा घोषणा आंदोलकांकडून दिल्या जात आहेत. औरंगाबाद मध्ये आंदोलन करत असलेल्या समर्थकांना पोलिसांकडून धरपकड करण्यात येत आहे.
पंकजा मुंडे यांनी उमेद्वारीवरून अजून कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. अजून दोन दिवस त्या माध्यमांसमोर काहीही बोलणार नाहीत असं त्यांनी सांगितलं आहे.