बिहारमध्येही राजकीय खेळ

राजकारणात होत आहे उलथापालथ
शिवशरण यादव
एकंदर खेळ सुरू झाला आहे. भाजप आणि संयुक्त जनता दलाचं सरकार कोसळलं की राज्यपालांना सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाला सत्तास्थापनेसाठी बोलवावं लागेल. थोडक्यात, इकडे महाराष्ट्रात जोरदार राजकीय उलथापालथ होत असताना बिहारमध्ये उलथापालथ झाली आहे.
अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, गोवा, मणिपूर, कर्नाटकमध्ये ‘ऑपशन लोटस’ यशस्वी झालं. आता भारतीय जनता पक्षाने तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि ओडिशावर लक्ष केंद्रित केलं असलं तरी बिहारमध्ये मात्र भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दलामध्ये सारं काही आलबेल नसल्याने सत्तापालट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तिथल्या अलीकडच्या काळातल्या वेगवान घडामोडी हेच सूचित करत आहेत.
महाराष्ट्राच्या राजकीय नाट्यादरम्यान बिहारमध्ये एक मोठा खेळ झाला असून, लवकरच तिथे सत्तापालट होण्याची शक्यता आहे. ‘मुस्लिमांचा सर्वात मोठा पुरस्कर्ता’ अशी ओळख असणार्या असदुद्दीन ओवेसी यांच्या ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन’ (एआयएमआयएम) पक्षात फूट पडली आहे. त्यांच्या पाचपैकी चार आमदारांनी राष्ट्रीय जनता दलामध्ये प्रवेश करून ओवेसींना मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव यांच्या या राजकीय नाट्याने पाटण्यापासून दिीपर्यंत खळबळ उडाली. आता ८० आमदारांसह राष्ट्रीय जनता दल हा विधानसभेतला सर्वात मोठा पक्ष बनला आहे. बिहारच्या सिंहासनाचा ताबा मिळवण्यासाठी तेजस्वी यादव यांना आता फक्त सहा आमदारांची गरज आहे. पडद्यामागे सुरू असलेला खेळ पाहता राष्ट्रीय जनता दलाने ठरवलं आणि काही तोडफोड केली तर तिथे सत्तांतर होईल, असं विश्लेषकांचं मत आहे.
‘एआयएमआयएम’च्या चार आमदारांच्या आगमनाने बिहारमधल्या महाआघाडीकडे आता ११६ आमदार आहेत. बिहार विधानसभेत बहुमतासाठी १२२ आमदारांची गरज आहे. लोकशाहीत आमदारांची पक्षांतरं ही नवी बाब नाही. पक्ष बदलणा आमदार सहसा सत्ताधारी पक्षासोबत जातात, कारण त्या बदल्यात त्यांना सत्तेचा आनंद मिळतो; मात्र ओवेसींच्या या चार आमदारांनी राष्ट्रीय जनता दलासोबत जाऊन राजकारणात नवी परंपरा सुरू केली. राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचं सरकार स्थापन झालं तर त्यांना मंत्री करण्याचं आश्वासन दिलं गेलं असावं. मात्र या आमदारांच्या राजकीय निर्णयाचं कौतुक करायला हवं, कारण राष्ट्रीय जनता दल सध्या विरोधात असल्याने त्यांनी मोठी जोखीम पत्करली आहे. तेजस्वी यादव आणखी सहा आमदारांना सोबत घेण्याचा जुगार खेळून सरकार स्थापन करू शकतील की नाही हे सध्या कोणालाच माहीत नाही. पण राजकीय विश्लेषकांच्या मते नितीशकुमार सरकारचे दिवस मोजण्याइतकेच आहेत आणि महाआघाडीचं सरकार स्थापन होणं निश्चित असल्याची खात्री पटल्यानेच ‘एआयएमआयएम’ च्या चार आमदारांनी मार्ग बदलला आहे. आता मोठा प्रश्न असा आहे की, तेजस्वी यादव बहुमताचा आकडा गाठण्यासाठी छोट्या पक्षांचे आणखी सहा आमदार फोडतील की सत्ता मिळवण्यासाठी पडद्याआडून आणखी काही मोठे डावपेच खेळले जातेल? हा प्रश्न उपस्थित करण्यामागचं मोठं कारण म्हणजे या संपूर्ण राजकीय घडामोडींनी नवं वळण घेतलं आहे. नितीशकुमार राष्ट्रीय लोकशाही आघाडी सोडू इच्छितात का, हा प्रश्नही आहे.
मुख्यमंत्री नितीशकुमार यांना राष्ट्रीय आघाडीतून बाहेर पडून आता महाआघाडीसोबत यायचं आहे का? जुन्या फॉर्म्युल्याच्या धर्तीवर तेजस्वी यांना उपमुख्यमंत्री आणि आघाडीतल्या अन्य नेत्यांना महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री करून त्यांच्या सरकारची उरलेला टर्म सुरक्षित करायची आहे का, हा खरा प्रश्न आहे. एक तर भाजपने नितीशकुमार आणि त्यांच्या पक्षाचं खच्चीकरण कसं केलं, हे सर्वज्ञात आहे. शिवाय नितीशकुमार यांनी जातनिहाय जनगणना, एनसीआर, सीसीएवरुन भाजपच्या विरोधात भूमिका घेतली. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यावरूनही दोन्ही पक्षांमध्ये चांगलाच कलह झाला. उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी भाजपने संयुक्त जनता दलाच्या नेत्यालाच फोडलं. दुसरीकडे, संयुक्त जनता दलातही सारं काही आलबेल नाही. नितीशकुमार यांच्याविरोधात नाराजी वाढत आहे. खरं तर नुकतेच संयुक्त जनता दलातून बाहेर फेकले गेलेले पक्षाचे प्रवक्ते अजय आलोक यांनी ट्वीट करून सूचित केलं आहे की राज्यात राजकारणाचा नवा खेळ सुरू झाला आहे.
त्यांच्या मते, त्यांचं नियंत्रण इतरत्र आहे. मात्र ते फक्त पाटण्यापुरतं मर्यादित आहे की ‘दिी दरबार’ त्याचं केंद्र आहे हे लक्षात येत नाही. असं झालं तर सारं प्रकरण अंगलट येईल कारण बिहार भाजपचे नेतेही नितीशकुमार यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी आतुर झाले आहेत. तथापि त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, भारतीय लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच ओवेसींच्या पक्षाचे आमदार मुख्य विरोधी पक्षात घुसले असले तरी सर्वात मोठा पक्ष राष्ट्रीय जनता दल हा सभागृहात स्थापन झाला आहे. एकंदर खेळ सुरू झाला आहे. भाजप आणि संयुक्त जनता दलाचं सरकार कोसळलं की राज्यपालांना सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाला सत्तास्थापनेसाठी बोलवावं लागेल. थोडक्यात, इकडे महाराष्ट्रात जोरदार राजकीय उलथापालथ होत असताना बिहारमध्ये उलथापालथ झाली आहे.