ताज्या बातम्यापिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडकरांचा श्वास गुदमरतोय !

थंडीचा हंगाम सुरू झाला आहे. कचरा जाळणे व शेकोटी पेटविण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यांच्यावर कारवाई करा. रस्ते नियमितपणे स्वच्छ करा. आवश्यक ठिकाणी रस्ते धुवून घ्या. खराब रस्ते दुरूस्त करा. शहरातील वाढलेले हवा प्रदूषण कमी करा, असे आदेश महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सर्व क्षेत्रीय अधिकार्‍यांना दिले आहेत. शहरातील हवेतील प्रदूषण वाढल्याचे दिसत आहे. एअर कॉलिटी इंडेक्स अतिधोकादायक स्थितीत गेला आहे. त्याची दखल घेऊन आयुक्त सिंह यांनी तातडीने बैठक घेतली.

शहरातील काही भागात प्रदूषणामुळे पिंपरी-चिंचवडची हवा खराब श्रेणीत गेल्याचे दिसून येत आहे. भोसरी, थेरगाव, पिंपरीसारख्या भागात सकाळी हवा गुणवत्ता निर्देशांक २००-२५० पेक्षा अधिक नोंदविला जात आहे. मात्र, हवा शुध्द करण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असतात. त्या यंत्रणादेखील फोल ठरू लागल्याचे दिसून येत आहे.

हवा गुणवत्ता निर्देशांक ५० पर्यंत असणे आवश्यक आहे. त्यापेक्षा अधिक प्रदूषण वाढल्यास त्याचे आरोग्यावर परिणाम होतात. शहरातील काही भागात मागील काही दिवसांत सकाळी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ३०० च्या पुढे नोंदवला गेला. यामध्ये भोसरीतील इंद्रायणीनगर येथे ३००, मोशी परिसरात ३२५, चिखली परिसरात ३६० आणि भोसरी ते हिंजवडी परिसरात ३०० च्या पुढे नोंदविली गेली आहे. एअर क्वालिटी इंडेक्स हे हवेची गुणवत्ता तपासण्याचे एक पॅरामीटर आहे. यामध्ये धुलीकण, कार्बन मोनाक्साईड, सल्फरडाय ऑक्साईड, लिड, जमिनीवरचे ओझोन हे सर्व मोजले जातात. हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) हा ० ते ५० पाहिजे. दिवाळीच्या वेळी हा ७०० च्या पुढे होता. नोव्हेंबर महिन्यात आम्ही आता रीडिंग घेतल्यावरदेखील तो ३०० च्या पुढे आहे.

शहरवासीयांच्या आरोग्यावर परिणाम

शहराची हवा शहरवासीयांच्या आरोग्यावर परिणामकारक ठरत आहे. त्यातून श्वसनविकाराचा धोका वाढत आहे. तसेच, अस्थमा, सीओपीडी, इतर फुप्फुसांच्या विकार असलेल्या रुग्णांना याचा मोठा त्रास होतो. पर्यावरण प्रेमींकडून हवा प्रदूषण कमी करण्यास महापालिका प्रशासन अपयशी ठरत असून केलेल्या उपाययोजना नावालाच असल्याचा आरोप होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये