अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर बांधकाम अंतिम टप्प्यात! मुर्तीसाठी मागवल्या परदेशातून शिळा..

(Prabhu Shri Ram Mandir Ayodya) : गेल्या तीन वर्षांपासून अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम यांचे भव्य मंदिर उभारण्याचं काम सुरू आहे. प्रभू श्रीराम यांच्या मूर्ती घडवण्यासाठी खास शाळीग्राम शिळा मागवण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. त्याप्रमाणे आता थेट नेपाळहून दोन अवाढव्य शाळीग्राम शिळा अयोध्येत आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच या शिळांमधून श्रीराम मूर्ती आकाराला येण्याची शक्यता आहे.
आज सकाळीच या दोन शिळा गोरखपूरहून अयोध्येमध्ये आणण्यात आल्या. यावेळी भक्तमंडळींनी या शिळांची मनोभावे पूजा केली आणि त्यानंतर या शिळा श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या ताब्यात दिल्या. या शिळांचा वापर प्रभू श्रीराम आणि जानकी यांच्या मूर्ती घडवण्यासाठी केला जाणार असल्याची माहिती देण्यात येत आहे. शाळीग्राम दगड हा जगभरात फक्त काली गंडकी नदीच्या किनारी भागात सापडतो. ही नदी नेपाळच्या मायगदी आणि मस्टँग जिल्ह्यातून वाहते. नेपाळमधील जनकपूर या ठिकाणी सीतामातेचं जन्मस्थान असल्याचं मानलं जातं. याच ठिकाणाहून या शिळा राम मंदिरातील मूर्ती घडवण्यासाठी मागवण्यात आल्या आहेत.
“नेपाळमध्ये काली गंडकी नावाचा एक धबधबा आहे. त्याचा उगम दामोदर कुंडातून होतो. गणेश्वर धाम गंडकीपासून उत्तरेकडे ८५ किलोमीटरवर हे कुंड आहे. या दोन्ही शिळा तिथून आणण्यात आल्या आहेत. समुद्रसपाटीपासून त्या ठिकाणाची उंची ६ हजार फुटांची आहे. हे दगड कोट्यवधी वर्षांपूर्वीचे असल्याचंही सांगितलं जातं. या दोन्ही शिळांचं वजन अनुक्रमे ३० आणि १५ टन आहे”, अशी माहिती श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी चंपत राय यांनी एएनआयशी बोलताना दिली.