“‘ही’ अभिनेत्री आहे माझी ड्रीम गर्ल”, प्रथमेश परबने केला खुलासा

मुंबई | Prathamesh Parab’s Dream Girl – मराठी अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) हा ‘टाइमपास’ (Timepass) या चित्रपटामुळे चांगलाच प्रसिद्धी झोतात आला आहे. प्रथमेशने टाइमपास या चित्रपटात ‘दगडू’ ही भूमिका साकारली आहे. “हम गरीब हुए तो क्या हुआ दिल से अमीर है’ म्हणणारा प्रथमेश पुन्हा एकदा वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. नुकतंच त्याने त्याच्या ड्रीम गर्लबद्दल खुलासा केला आहे.
प्रथमेश परब सध्या ‘टाइमपास 3’ (Timepass 3) या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमेशन ‘सकाळ’ वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी त्याने त्याच्या ड्रीम गर्लबद्दल खुलासा केला आहे. या मुलाखतीत त्याला ‘तुझी आता ड्रीम गर्ल कोण?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना तो म्हणाला, “सध्या माझी ड्रीम गर्ल अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आहे. मी आत्तापर्यंत तिच्यासारखी अभिनेत्री पाहिलेली नाही. ती प्रत्येक चित्रपटात नव्याने समोर येते.”
“मला तिच्याविषयी फार आदर आहे. मला आलिया भट्टसोबत काम करण्याची फार इच्छा आहे. जर भविष्यात तशी संधी मिळाली तर मी ती कधीच नाकारणार नाही”, असंही प्रथमेश परबने म्हटलं आहे. दरम्यान, ‘टाइमपास 3’ हा चित्रपट दिवसेंदिवस प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. येत्या 29 जुलैला झी स्टुडिओजच्या माध्यमातून हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.