हरितालिका पूजेचे पौराणिक महत्त्व

–सारिका रोजेकर
हरितालिका हे हिंदू धर्मातील महिला आणि कुमारिकांसाठी एक धार्मिक व्रत आहे. पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली, म्हणून पार्वतीला ‘हरितालिका’ म्हणतात.
सण-उत्सवांचा श्रावण सरला की, सर्वांना वेध लागतात, ते गणपतीचे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्रीगणेशाची पार्थिव पूजा केली जाते. मात्र, त्यापूर्वी भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिकेचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. पुराणकाळापासून केल्या जाणाऱ्या या हरितालिकेच्या व्रताचे मोठे महत्त्व आहे. हे व्रत कुमारिका चांगला, सुयोग्य वर मिळावा, म्हणून करतात, तर विवाहित स्त्रिया सुखी वैवाहिक जीवन आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात.
हरिता म्हणजे जिला नेले ती आणि आलि म्हणजे सखी. पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली, म्हणून पार्वतीला ‘हरितालिका’ असे म्हणतात. प्रामुख्याने पार्वतीने आपल्याला मनाजोगता वर मिळवण्यासाठी केलेली उपासना म्हणजे हरितालिका व्रत असे मानले जाते. हिमालयाने आपल्या रूपसुंदरी मुलीचा विवाह विष्णूशी करण्याचे योजिले होते.
पौराणिक अाख्यायिकेनुसार, हिमालय पर्वतराजाची कन्या पार्वती उपवर झाली आणि नारदाच्या सांगण्यावरून पर्वतराजाने तिचा विवाह भगवान विष्णूशी करण्याचे ठरवले. मात्र पार्वतीच्या मनात भगवान शंकर असल्यामुळे तिने आपल्या सखीकडून वडिलांना निरोप पाठवला. तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करेन, असे तिने सांगितले. तसेच आपल्या सखीच्या मदतीने ती घरातून पळून गेली आणि शिवप्राप्तीसाठी सलग १२ वर्षे तिने अरण्यात जाऊन कठोर तपस्या केली.
यंदा व्रतासाठी शुभ मुहूर्त
पंचागातील माहितीनुसार, यावर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेची पवित्र तिथी २९ ऑगस्ट २०२२, सोमवारी दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी सुरू होत असून, ३० ऑगस्ट २०२२, मंगळवारी दुपारी ३ वाजून ३३ मिनिटांपर्यंत आहे. हरितालिकेचे व्रत ३० ऑगस्ट २०२२ रोजी उदय तिथीमध्ये ठेवण्यात येणार अाहे. यादिवशी पहाटे ५ वाजून ५८ मिनिटे ते ८ वाजून ३१ मिनिटांपर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असेल.
भाद्रपद महिन्यातील शुद्ध तृतीयेला हस्त नक्षत्रावर पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली. दिवसभर कडकडीत उपवास केला. जागरण केले. तिच्या या तपाने महादेव प्रसन्न झाले आणि पार्वतीच्या विनंतीला मान देऊन त्यांनी तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला. यामुळे कुमारिकांपासून महिलांपर्यंत हरितालिका पूजन करण्याची प्रथा पारंपरिक आहे.