पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, ५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. याप्रसंगी वाशिम आणि ठाणे येथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. वाशिममध्ये पंतप्रधान २३,३०० कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुपालन क्षेत्रातील विविध उपक्रमांचा शुभारंभ करतील.
या योजनेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा १८वा हप्ता वितरित केला जाणार असून, यामुळे सुमारे ९.४ कोटी शेतकऱ्यांना २०,००० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. पंतप्रधान कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत सुमारे १,९२० कोटी रुपयांचे ७,५०० हून अधिक प्रकल्प समर्पित करतील. तसेच ९,२०० शेतकरी उत्पादक संघटनांचे राष्ट्रार्पण करतील.
तसेच, बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचे प्रतीक असलेल्या “बंजारा विरासत संग्रहालयाचे” पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यानंतर ठाणे येथे सुमारे ३२,८००कोटी रुपयांच्या विविध नागरी विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.
यामध्ये मुंबई मेट्रो लाईन ३ फेज १ च्या आरे जेव्हीएलआर ते बीकेसी या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. हा प्रकल्प मुंबईतील शहरी वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. याशिवाय, ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि उन्नत पूर्व मुक्त मार्ग विस्तार प्रकल्पांचीही पायाभरणी होईल. ठाणे महापालिकेच्या नव्या इमारतीचा पायाभरणी समारंभही पंतप्रधानांच्या हस्ते पार पडणार आहे.
या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या कृषी, नागरी आणि औद्योगिक विकासाला चालना देणाऱ्या विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत, ज्यामुळे राज्याच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळेल.