यू मुंबा संघाचा पहिला विजय

विवो प्रो कबड्डी लीग स्पर्धेत यूपी योद्धा पराभूत
बंगळुरू : यू मुंबा संघाच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच उत्कृष्ट खेळ करून विवो प्रो कबड्डी स्पर्धेत यूपी योद्धाचा ३०-२३ गुणांनी सहज पराभव करून विजय नोंदविला. पूर्वार्धात मुंबई संघाकडे १४-९ अशी आघाडी होती. हीच आघाडी त्यांच्यासाठी महत्वपूर्ण ठरली.
मशाल स्पोर्ट्स यांच्या वतीने श्री कांतीरवा स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मुंबई संघाला दबंग दिल्लीकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळेच आजचा सामना जिंकण्यासाठी त्यांनी जिद्दीने सराव केला होता. सामन्याच्या सुरुवातीपासूनच त्यांनी आघाडी घेतली आणि ती वाढवत मध्यंतराला पाच गुणांचे अधिक्य मिळवले. यूपी योद्धाचा भरवशाचा खेळाडू परदीप नरवाल याला आज अपेक्षेइतका सूर गवसला नाही. त्याने दहा गुण नोंदविले. परंतु, त्यांच्याकडून यापेक्षा जास्त कामगिरीची अपेक्षा होती. ही अपेक्षा त्याला पूर्ण करता आली नाही. त्याचा फायदा मुंबा संघाने घेतला नाही तर नवलच.
उत्तरार्धातही मुंबा संघाने सामन्यावरील नियंत्रण कायम राखले होते. यूपी योद्धा संघाने थोडी लढत दिली. मात्र, मुंबा संघाची आघाडी तोडण्यात ते सपशेल अपयशी ठरले. मुंबई संघाकडून गुमान सिंग व आशिष कुमार यांनी खोलवर चढाया केल्या आणि अधिकाधिक गुण मिळविले. सुरेंद्र सिंग याने चढायांबरोबर उत्कृष्ट पकडी करीत त्यांना चांगली साथ दिली. यूपी योद्धा संघाकडून सुरींदर गिल याने चांगल्या चढाया केल्या तर सुमित कुमार व आशू सिंग यांनी अचूक पकडी केल्या.