“सध्याचं सरकार हे चोराचं सरकार…”, प्रकाश आंबेडकर यांचा घणाघात

नागपूर | Prakash Ambedkar – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शिंदे सरकारवर (Shinde Government) हल्लाबोल केला आहे. “महाराष्ट्र सरकार लोकांच्या प्रश्नात गुंतण्यापेक्षा स्वतःच्या पक्षातील गुंत्यामध्ये अडकलं आहे”, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. आज (27 डिसेंबर) वंचित बहुजन आघाडीनं महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ विधानभवनावर मोर्चा काढला आहे. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना प्रकाश आंबेडकरांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “अतिक्रमणबद्दल न्यायालयीन लढाईत राज्य सरकार न्यायालयात बाजू मांडायला गेलं नाही. त्यामुळे न्यायालयानं अधिकाऱ्यांना अतिक्रमण हटवायला सांगितलं. याबद्दल महाराष्ट्र सरकारला निवेदन देऊन विनंती केली. सरकारनं फक्त आश्वासन दिली. मात्र, करत काहीही नाहीत. सध्याचं सरकार हे चोराचं सरकार आहे. हे सरकार बदलायला हवं.”
पुढे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर टीकास्त्र सोडलं. “मुख्यमंत्री आपण रिक्षाचालक असल्याचं सांगताना आपली सुरुवात ही सामान्य नागरिक म्हणून झाली आहे. आज सर्वच सुलतान उभे झाले आहेत. एक ना धड भाराभर चिंध्या अशी परिस्थिती आहे. सुप्रीम कोर्ट म्हणतं मागासवर्गीयांचं अतिक्रमण सोडून इतर काढा. उच्च न्यायालय म्हणतं सर्व अतिक्रमण काढा. मग नक्की ऐकायचं कोणाचं, छोटे साहेबांचं की मोठे साहेबांचं”, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.