मतदान केंद्राच्या परिसरात मोबाईल वापरास बंदी

विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या वेळी मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांना मतदान केंद्रावर मोबाईल नेता येणार नाही किंवा मोबाईल नेलाच तर बाहेर ठेवावा लागणार आहे. मोबाईलजवळ ठेवून मतदान केले आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यास त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार आहे.
मतदान केंद्रावर छायाचित्रीकरण करण्यास बंदी असून, मोबाईल, स्मार्टफोन, स्मार्टवॉच, वायरलेस सेट यासह इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी अनावधानाने एखाद्या मतदाराने मोबाईल मतदान करण्यासाठी सोबत आणल्यास मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या अंतरावर ठेवावा लागणार आहे.
उमेदवार आणि मतदारांनी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन सूचनांचे करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मतदार केंद्रावर मोबाईल सापडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
ईव्हीएम मशीन, मतदान केंद्र, मतमोजणी केंद्र आदी ठिकाणी निवडणूक प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात दरम्यान निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, मतदान प्रतिनिधी, मतमोजणी प्रतिनिधी, मतदार यांना मोबाईल, स्मार्टवॉच, इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन जाण्यास बंदी आहे. तसेच निवडणूक कामकाजाचे व्हिडीओ तसेच छायाचित्रे काढून सोशल मीडियावर प्रसारित करणे हा गंभीर गुन्हा आहे. असे करणार्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी दिली.