दादा! खड्ड्यासारखाच स्टंट करा, पण…

स्वच्छ पाणी देण्याची कोथरूडकरांनी केली पालकमंत्र्यांकडे मागणी
पुणे : Pune news : काही दिवसांपूर्वी कोथरूडकरांनी (Kothrud) लोकसहभागातून, लोकवर्गणीतून येथील खड्डे बुजवण्याचे काम केले. त्या वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी त्या खड्ड्याशेजारी चक्क बॅनर कटिंग लावून आपली छबी असलेले पोस्टर झळकावले. येथे सावधतेने जावे काम सुरू आहे अशा प्रकारचे बॅनर त्याला लटकावले. लोकप्रतिनिधींचे कर्तव्य म्हणून आपण जे करू शकलो नाही, ते नागरिकांनी केले याबद्दलचे आत्मपरीक्षण राहिले बाजूला; परंतु त्यातही आपले मार्केटिंग करण्याची संधी त्यांनी सोडली नाही, याची कोथरूड आणि पुणे परिसरामध्ये मोठी चर्चा झाली होती. (Pune bjp chandrakant patil kothrud news)
भाजप अंतर्गत काही पदाधिकाऱ्यांनी देखील या गोष्टीची टिंगल उडवली होती. सध्या कोथरूडकर यांच्याबाबत अशुद्ध पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन काही ठिकाणी एकत्रित झाल्याने दूषित पाणी लोकांना मिळत आहे. याबाबत शनिवारी आरपीआयचे जोशी यांनी आयुक्तांना दूषित पाण्याच्या बाटल्या भेट दिल्या होत्या. पालकमंत्री, महापौर आणि प्रमुख पक्षनेते हे कोथरूड परिसरामध्ये असताना देखील सत्ताधारी भाजपचे याकडे प्रचंड
दुर्लक्ष आहे.
त्यामुळे खड्ड्यासारखा स्टंट करा, परंतु आम्हाला स्वच्छ पाणी द्या, असा उपहासात्मक सल्ला सध्या पुणेकर देऊ लागले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी खड्ड्याबाबतचा जो प्रकार केला, तो पाण्याबाबत करा. तुमचे यथेच्छ मार्केटिंग करा; परंतु आम्हाला शुद्ध पाणी द्या अशी विनंती सध्या गुरु गणेशनगर, वनाज या परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
विशेषतः कोथरूड परिसरामध्ये जे काही झोपडपट्टी सदृश वसाहती आहे. तेथे मात्र आरोग्याच्या आणि पाण्याच्याबाबत प्रचंड दुर्लक्ष आहे. येथे जणू काही नागरिकच राहत नाहीत, अशा पद्धतीने प्रशासन यांच्या ठिकाणी दुजाभाव करतात. सोसायटीची काही हक्काची मते आणि उच्चभ्रू लोकांना काही नेते मंडळींना हाताशी धरले की, कोथरूडमध्ये सहज विजय खेचून आणता येतो, हे गणित भाजपाच्या लोकांच्या मनात ठाम बसल्याने अन्य समाज घटक दुर्लक्षित राहतात, असा आरोप सध्या होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे काही कार्यकर्ते तसेच आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील कोथरूडच्या समस्यांबाबत आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. केवळ मतांच्या गठ्ठ्याच्या पलीकडे जाऊन आणि त्याच त्या कार्यकर्त्यांच्या पुढे जाऊन देखील कोथरूडकर म्हणून आम्ही येथे जीवन जगत आहोत, तरी आमच्याकडे लक्ष द्या, अशी प्रतिक्रिया शिवशक्तीचे गजानन सरदेशमुख यांनी दिली आहे.