होळी खेळणाऱ्यांनो जरा जपून! हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पुणे पोलिसांची करडी नजर

पुणे | होळी हा रंगांचा सण देशभरात साजरा केला जातो. अवघ्या काही दिवसांवर आलेला हा सण साजरा करण्यासाठी लोकं जोरदार तयारी करत आहेत. होळी (Holi 2023) हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. यंदा हा सण 8 मार्च रोजी साजरा होणार आहे. अशावेळी सर्वजण या उत्सवाच्या तयारीत व्यस्त आहेत. विशेषता होळीचा सण तरुणांच्या आवडीचा असतो.
या दिवशी रंग, पिचकारी आणि पाण्याचे फुगे एकमेकांच्या अंगावर फेकून घेऊन मजा करणं तरुणांना आवडतं. पण, या आनंदाच्या सणात रंग खेळण्यासाठी जमलेल्या अनेक स्त्रिया आणि मुलींशी गैरवर्तन झाल्याच्या अनेक घटना समोर येतात. ही बाब लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी खास होळीसाठी महिलांसाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे. कोणत्याही महिलेशी गैरवर्तणूक झाल्यास ती या हेल्पलाईनवर तक्रार नोंदवू शकते.
विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी मान्य केलं की, दरवर्षी होळीच्या उत्सवादरम्यान पोलीस नियंत्रण कक्षाला लैंगिक अत्याचार, छळ आणि इतर गुन्ह्यांची तक्रार करणाऱ्या अनेक महिलांचे कॉल येतात. त्यामुळे पोलीस विभागानं होळीच्या कार्यक्रमांना परवानगी देताना, आयोजकांसाठी अनेक गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. या गाईडलाइन्समध्ये महिलांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी होळी पार्टीच्या ठिकाणी योग्य कर्मचारी नियुक्त करण्याच्या अटीचा समावेश आहे. आर. राजा म्हणाले, “आम्ही महिलांनादेखील आवाहन करतो की, छेडछाड झाल्यास किंवा असुरक्षित वाटत असल्यास त्यांनी 112 क्रमांकावर कॉल करावा. हा कॉल जवळच्या पोलीस स्टेशनशी जोडला जाईल आणि तत्काळ कारवाई केली जाईल.”