H3N2 व्हायरस संदर्भात मोठी अपडेट! आरोग्य यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश

मुंबई | H3N2 Virus आता किती धोकादायक ठरू शकतो याचा आतापर्यंत डॉक्टर आणि जाणकार केवळ अंदाज बांधत होते. पण गेल्या काही दिवसांपासून व्हायरसमुळे भारतात मृत्यूंची नोंद झाली आहे आणि हीच भारतासाठी चिंतेची गोष्ट आहे. जानेवारी महिन्यापासून देशात एडेनोव्हायरसचे रुग्णही नोंदवले जात आहेत. दरम्यान अनेक राज्यांमध्ये कोविड-19 संसर्गामध्येही वाढ दिसून आली आहे, अशा परिस्थितीत आता केंद्राने सर्वच राज्यांना अलर्ट दिला आहे. H3N2 Virus संदर्भात आज महत्त्वाची बैठक आज पार पडली. यात राज्यातील वैद्यकीय यंत्रणांना सावध राहण्याचे आदेश आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिले आहेत.
बैठकीत काय झालं?
H3N2 Virus संदर्भात बैठकीत आरोग्य मंत्र्यासह अधिकारी उपस्थित होते. यात महाराष्ट्रातील वैद्यकीय यंत्रणांना सावध राहणचे आदेश आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिले आहेत. तर सर्वच आरोग्य यंत्रणांना या विषाणूवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. खासकरुन ठाणे, मुंबई आणि पुणे या भागात जास्त लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याचा प्रसार वाढू नये यासाठी काळजी घ्यावी, या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यांना सतर्क राहण्याच्या आणि वाढत्या संसर्गावर सतत लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासनही देण्यात आले आहे. अद्याप कोणतेही निर्बंध लागू करण्यात आले नाही.