तीन दिवसांपूर्वीच झाला होता रवींद्र महाजनी यांचा मृत्यू, पोलिसांनी दिली माहिती; म्हणाले, “त्यांचा मुलगा गश्मीर…”

पुणे | Ravindra Mahajani Death – ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचं निधन झालं आहे. ते 77 वर्षांचे होते. ते पुण्यातील तळेगाव दाभाडेजवळ आंबी या गावातील घरी मृतावस्थेत आढळले. तसंच दोन ते तीन दिवसांपूर्वीच त्यांचं निधन झालं असल्याची प्राथमिक माहिती तळेगाव पोलिसांनी दिली आहे.
रवींद्र महाजनी यांचा तीन दिवसांपूर्वीच मृत्यू झाला असल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. तसंच मागील आठ महिन्यांपासून ते घरी एकटेच राहत होते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सावंत यांनी दिली. तर गेल्या काही दिवसांपासून रवींद्र महाजनी हे पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे राहत होते. तसंच शुक्रवारी रवींद्र महाजनी यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती त्यांच्या शेजाऱ्यांनी तळेगाव पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत महाजनी यांच्या घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी पोलिसांना घरात महाजनी यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. यांसदर्भातलं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं दिलं आहे.
पोलिसांनी रवींद्र महाजनी यांचा मुलगा, अभिनेता गश्मीर महाजनीला कळवलं आहे. गश्मीर हा मुंबईला राहत असून तो आता तळेगावला येण्यासाठी रवाना झाला आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली. दरम्यान, शवविच्छेदनानंतर महाजनी यांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाणार आहे.