वंदनीय विनायक विश्वनाथ पेंडसे

पुणे शहरातून पथक संस्कृतीचा पाया रचणारे, शिस्तबद्ध बरची नृत्य आणि त्यासाठी लयबद्ध ढोल-ताशावादन प्रकाराचे जनक, युवाशक्तीचे प्रेरणास्थान आणि ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक-संचालक कै. विनायक विश्वनाथ तथा अप्पासाहेब पेंडसे. (जन्म ः १७ ऑगस्ट १९१६) ज्ञानप्रबोधिनीची स्थापना केल्यानंतर गणेशोत्सवाचे हिडीस रूप बदलण्यासाठी कै. अप्पांच्या कल्पनेतून बरची नृत्याचे पहिले शिस्तबद्ध पथक उभे राहिले. नृत्याच्या साथीला हळूहळू वाढत जाणाऱ्या गतीचे ढोल-ताशावादन कै. अप्पांच्या कल्पनेतून साकारले.
पुण्याजवळच्या गावांमधून त्यांनी प्रबोधिनीत २-३ ढोल आणले. तेव्हाचे ढोल लाकडी होते. आपण आज वाजवतो ते ढोलावरचे मूळ तालही अप्पांनाच सुचले होते. मिरवणुकीत भगवा ध्वज अभिमानाने नाचवण्याची नवीन परंपरा त्यांनी सुरू केली. आज ती पथकापथकातून रुजली आहे.
हाल्याच्या दंगलीच्या वर्षी पोलिसांनी वाद्यांवर आणि मिरवणुकीवर बंदी घातली. त्याचा निषेध म्हणून अप्पांनी विसर्जन मिरवणुकीत गणपतींसोबत बेलबाग ते अलका चौक ताशावादन केले. आज पथके अभिमानाने रस्त्यावर ढोल उचलू शकतात, याचे श्रेय कै. अप्पांच्या समर्थ आणि निर्भीड व्यक्तिमत्त्वाला द्यावे लागेल.
१९७५ नंतर मुलींचेही पहिले पथक सुरू झाले आणि मुलींचाही बरची आणि वादनाच्या माध्यमातून उत्सवात सहभाग सुरू झाला. नूमवि, गरवारे आणि रमणबाग या नावाजलेल्या शाळांमध्ये जाऊन कै. अप्पांनी बरची-टिपरी पथके वसवली.
देवदासींना उत्सवात सहभागी होण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी अप्पा झगडले.
पथक म्हणजे अमाप जोष आणि सळसळता उत्साह. पथक म्हणजे फुरफुरते बाहू तरीसुद्धा कडक शिस्त.पथक म्हणजे अतूट मैत्री आणि घट्ट नाती. पथक म्हणजे सामाजिक हेतू आणि अर्थपूर्ण संघटना!
‘One is zero but two are infinity’ हे अप्पांचे वाक्य आपल्याला पथकांची मूळ भूमिका स्पष्ट करते. सामाजिक हेतूने एकत्र येण्यासाठी पथक आहे. ‘बरची-वादन-ध्वज हे केवळ माध्यम आहे,’ ही अप्पांची मूळ कल्पना. आपण कलाकारांचा गट नसून पथक म्हणजे कार्यकर्त्यांचा संच आहे, हे त्यांचे आग्रही मत होते. कै. अप्पांच्या स्मृतींना सादर प्रणाम.