‘विराट अन् रोहितमुळं टीम इंडियाची वाटणी’; प्रशिक्षकाच्या नव्या दाव्यामुळं क्रिकेट विश्वात खळबळ!

नागपूर : (Rohit Sharma Virat Kohli Controversy) जगातील दोन दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली. टीम इंडियाचे हे दोन दिग्गज क्रिकेटपटू जेव्हा-जेव्हा मैदानात उभे राहिले तेव्हा करोडो चाहत्यांनी त्यांच्या आशा पल्लवित केल्या. 2008 या वर्षा पासून दोघांनीही भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यात खूप योगदान दिले आहे. दोघांनी मिळून संस्मरणीय भागीदारीही केल्या, पण एकेकाळी दोघांमध्ये मतभेद झाल्याच्या बातम्या आल्या. आता याबाबतची माहिती एका पुस्तकात देण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.
आजही जेव्हा रोहित शर्मा आणि विराट कोहली एकत्र फलंदाजी करतात आणि पूर्ण फॉर्ममध्ये असतात, तेव्हा जागतिक क्रिकेटमध्ये यापेक्षा चांगले दृश्य क्वचितच असेल. पण एक काळ असा होता की, कोहली आणि रोहित यांच्यात मतभेद असल्याच्या अफवा सर्वत्र पसरल्या होत्या. त्या अफवांमध्ये काही तथ्य आहे का हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. भारताचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनी त्यांच्या पुस्तकात याचा खुलासा केला आहे. रोहित आणि कोहली यांच्यात गोष्टी कशा बिघडल्या हे त्यांनी सांगितले आहे, पण परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी तत्कालीन मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी घेतली.
आर श्रीधर यांनी त्यांच्या ‘कोचिंग बियॉन्ड’ या पुस्तकात लिहिले आहे की, 2019 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून आमच्या संघाचा पराभव झाल्यानंतर बरेच काही लिहिले गेले आहे. ड्रेसिंग रूममध्ये कथितपणे काय घडले याबद्दल बऱ्याच वाईट बातम्या होत्या. तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की संघ रोहित आणि विराट यांच्यात वाटला आहे. एक कॅम्प रोहितचा आणि एक कॅम्प विराटचा आहे. कोणीतरी सोशल मीडियावर दुसर्याला अनफॉलो केले होते.
श्रीधरने पुढे लिहिले, ‘एकदिवसीय विश्वचषकानंतर सुमारे 10 दिवसांनी आम्ही लॉडरहिल येथे वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिकेसाठी अमेरिकेत उतरलो. रवी शास्त्री यांनी प्रथम विराट आणि रोहितला आपल्या खोलीत बोलावले आणि त्यांच्याशी चर्चा केली. रवी त्याला म्हणाला, तुम्ही हे सर्व मागे सोडून संघाला पुढे नेण्यासाठी एकत्र राहावे असे मला वाटते. मुख्य प्रशिक्षक शास्त्री यांनी मध्यस्थी केल्यावर कोहली आणि रोहितने ‘रीसेट’ बटण सेट केले होते.