राष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

पावसाच्या सरी झेलत रोटी घाट केला पार…

संत तुकाराममहाराज पालखी सोहळा

ज्ञानेश्वर माऊलींचे वाल्ह्याकडे प्रस्थान
-जेजुरी : श्री संतशिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याने आज जेजुरीचा निरोप घेतला. सकाळी ७ वाजता माऊलींच्या पादुकांची पूजा केल्यानंतर सोहळ्याने जेजुरी मुक्काम हलवून वाल्ह्याकडे प्रस्थान ठेवले. सकाळी साडेनऊ वाजता सोहळा सह्याद्रीच्या डोंगररांगेतील दौंडज खिंडीत न्याहरीसाठी विसावला होता. या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातून शेतकरी कुटुंबांची भाजीभाकर आणि सामाजिक संस्थांकडून वाटप करण्यात आलेल्या पदार्थांची न्याहरी केली. यावेळी संत सावतामाळी यांच्या अभंगातील ओव्या गात न्याहरीचा आस्वाद घेतला. संपूर्ण डोंगर परिसरात ठिकठिकाणी विसावलेले वैष्णवांचे जथ्थे हे दृश्य अत्यंत नयनरम्य दिसत होते. तासाभराचा न्याहरीचा विसावा उरकून सोहळ्याने वाल्हे गावाकडे प्रयाण केले.

बाळासाहेब मुळीक
यवत : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराममहाराज यांचा पालखी सोहळा दौंड तालुक्यातील दोन दिवसांचा मुक्काम संपवून बारामती तालुक्याकडे जात असताना दौंड तालुक्यातील रोटी घाट पालखी सोहळ्याने पावसाच्या सरी झेलत पार केला. यावेळी घाटात पालखीरथ ओढण्यासाठी सात बैलजोड्या लावण्यात आल्या होत्या.

पालखी सोहळा दौंड तालुक्यातील वरवंड येथील मुक्काम संपवून आज सोमवारी सकाळी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाला. पालखी सोहळा पाटस येथील नागेश्वर मंदिर येथे काही काळ विसावला. यानंतर ११ वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळा आज मुक्कामी असणार्‍या गवळ्याच्या उंडवडीकडे मार्गस्थ झाला. रोटी घाटात पालखी सोहळा आल्यावर वरुणराजाने हजेरी लावली. पावसाच्या बरसणार्‍या सरींमुळे वारकर्‍यांमध्ये उत्साह संचारला होता. सरी झेलत सात बैलजोड्यांच्या साहाय्याने पालखीरथाने घाट लीलया पार केला. रोटी घाटादरम्यानच्या रस्तारुंदीकरणाचे काम जवळपास पूर्णत्वाकडे येत असल्याने वारकर्‍यांना अथवा वाहनांना कोणताही अडथळा आला नाही. रोटी घाट पार केल्यानंतर प्रथेप्रमाणे तुकाराममहाराजांच्या पादुकांची आरती करण्यात आली. रोटी येथे पालखी सोहळा दुपारच्या विश्रांतीनंतर पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाला. पुढे हिंगणीगाडा, वासुंदे असा दौंड तालुक्यातील प्रवास संपवून पालखी सोहळा बारामती तालुक्यात प्रवेश करेल. आज पालखी सोहळा बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडी येथे मुक्कामी असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये