ठाकरे गटाला मोठा दिलासा! अखेर ऋतुजा लटकेंचा राजीनामा BMC कडून मंजूर

मुंबई | Rutuja Latke Resignation – शिवसेना आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्वच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाची उमेदवारी मिळालेल्या ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा BMC कडून मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राजीनामा स्वीकृती पत्र पालिकेनं लटके यांना दिलं आहे. त्यामुळे आज दुपारी 12 च्या सुमारास लटके या आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत.
ऋतुजा लटके आणि मुंबई महापालिका अशा दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर हायकोर्टानं काल (13 ऑक्टोबर) दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास आपला निकाल दिला. उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत लटके यांना राजीनामा स्विकारल्याचं पत्र द्या, असा आदेश हायकोर्टानं मुंबई महापालिकेला दिला आहे. या परिस्थितीत आम्हाला हस्तेक्षेप करावा लागत आहे, अशी टिप्पणीही हाकोर्टानं निर्णय देताना केली होती. त्यानुसार मुंबई महापालिकेनं आज सकाळीच ऋतुजा लटके यांचा राजीनामा अखेर मंजूर केला.
दरम्यान, या पोटनिवडणूकीसाठी महाविकास आघाडीकडून ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, त्या मुंबई मनपाच्या कर्मचारी असल्यानं त्यांचा राजीनामा महापालिकेनं मंजूर केला नव्हता. त्याविरोधात ठाकरे गटानं हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, आता ऋतुजा लटकेंना मुंबई हायकोर्टानं दिलासा दिला. तसंच लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने काल दिले होते.