“त्यांना अटक होतेय की नाही हे मला…”, राऊतांच्या कारवाईवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

मुंबई | CM Eknath Shinde’s Reaction On ED’s Action Against Sanjay Raut – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीचं पथक त्यांच्या घरी दाखल झालं आहे. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचं (ED) पथकं आज (31 जुलै) सकाळी 7 वाजता संजय राऊत यांच्या मुंबई येथील घरी दाखल झालं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राऊतांच्या मैत्री बंगल्याबाहेरच ईडीविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. तर दुसरीकडे यावर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. यामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज (31 जुलै) औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, संजय राऊतांची चौकशी सुरू आहे. ही चौकशी होऊ द्या. त्यांना अटक होतेय की नाही हे मला माहिती नाही. मी ईडीचा अधिकारी नाही. ते तर म्हणत होते मी काहीच केलं नाही. त्यामुळे ‘कर नाही त्याला डर कशाला’ असायला हवी. ते ईडीच्या चौकशीला सामोरं जाणार बोलत होते. आज चौकशी होऊ द्या. त्यातून जे पुढे येईल ते तुम्हाला कळेलच. ते महाविकास आघाडीचे मोठे नेते होते. दररोज 9 वाजता तुम्ही त्यांची बाईट घेत होता”.
“केंद्रीय तपास संस्थांनी यापूर्वी देखील काही कारवाई केल्या आहेत. त्यांनी सुडाने काम केलं असतं, चुकीच्या पद्धतीने कारवाई केली असती तर न्यायालयाने त्यांना लगेच दिलासा दिला असता. यापूर्वीच्या देखील कारवाया तपासून घ्या. आम्ही एवढं मोठं सरकार बनवलं त्यात एक तरी सुडाची कारवाई केली का? आमच्यापैकी एका आमदाराने तरी सांगितलं का की ईडीने नोटीस पाठवली म्हणून आम्ही तिकडे गेलो. असं कुणी म्हणालं का?” असा सवालही एकनाथ शिंदेंनी विचारला.