‘सनी देओलचा बंगला वाचवण्यासाठी दिल्लीहून संदेश, पण नितीन देसाई यांना…’; राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई : (Sanjay Raut On Sunny Deol) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अन् खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. यावेळी राऊत म्हणाले, अभिनेता आणि खासदार सनी देओलच्या जुहू येथील बंगल्याचा लिलाव जाहिरात प्रसिद्ध होताच अवघ्या २४ तासांत रद्द करण्यात आला. सनी देओलचं घर वाचवण्यासाठी दिल्लीहून संदेश आला. पण कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना कुठलीही मदत केली गेली नाही त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आलं असा आरोप राऊतांनी केला आहे.
नितीन देसाई यांच्या आत्महत्येविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, भाजपचे खासदार अभिनेता सनी देओल यांच्या बंगल्याचा लिलाव बँक ऑफ बडोदा करणार होती. तब्बल ६० कोटींचं कर्ज ते फेडू शकले नाहीत. बँकेने लिलाव पुकारला आणि लोकांना बोलवलं. आमचं सनी देओल यांच्याशी काही वयक्तिक वाद नाही. पण २४ तासांत तुम्ही तो लिलाव थांबवला. दिल्लीहून संदेश आला. तुम्ही त्यांचं घर आणि त्यांना वाचवलं.
मात्र, आपले नितीन देसाई यांचा स्टूडिओ वाचवण्यासाठी वणवण भटकत होते. त्यांनाही कर्ज फेडयचं होतं. दोन दिवसांपूर्वी ते दिल्लीत जाऊन भाजप नेत्यांना भेटले पण त्यांना काही दिलासा मिळाला नाही. नितीन देसाई यांचा स्टूडिओ आणि जीव देखील वाचवण्यात नाही आला.
चार-पाच हजार कोटींचे बँक घोटाळे समोर येत आहेत, त्याच्यावर कारवाई होत नाही. भाजपशी संबंध असलेल्या लोकांचे हजारो कोटींचे कर्ज माफ करण्यात आले. मात्र नितीन देसाई यांच्या बद्दल असा निर्णय घेण्यात आला नाही. त्यांना मरू दिलं गेलं, त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आलं, असा गंभीर आरोप देखील खासदार संजय राऊत यांनी केला.