“अडीच वर्षांत काय केलं…”, श्रीकांत शिंदेंच्या व्हायरल फोटोवर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया

मुंबई | Sudhir Mungantiwar’s Reaction To Shrikant Shinde’s Viral Photo – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे (Ravikant Varpe) यांनी एक फोटो त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. मागे ‘महाराष्ट्र शासन..मुख्यमंत्री’ असा बोर्ड असताना पुढे खुर्चीवर श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) बसल्याचं या फोटोमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे राज्याचा कारभार श्रीकांत शिंदे हाकतात का? असा सवाल विरोधकांकडून करण्यात येत आहे. या संदर्भात आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“अडीच वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना जनहिताचे काय निर्णय केले, हे सांगण्यासारखं काही राहिलंच नाही. शिवसेनेचा एक नेता राष्ट्रवादीच्या नेत्यासाठी कशा पद्धतीने खुर्ची घेऊन धावत गेला, हेही महाराष्ट्रानं पाहिलं आहे. शिवसेनेचे प्रमुख आणि त्यांचे सुपुत्र सोनिया गांधींच्या समोर किती वाकून अभिवादन करत होते, हेही महाराष्ट्रानं पाहिलं आहे. आता अडीच वर्षांत काय केलं, हे सांगण्यासारखं नसल्यामुळे कोण कुणाच्या खुर्चीवर बसलंय यावर बोलत आहेत. त्या खुर्चीवर कुणी एखादी व्यक्ती बसली, तर त्यात आक्षेपार्ह काहीच नाही. स्टेट वाईल्डलाईफ बोर्डाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही उपाध्यक्ष म्हणून ही बैठक चालवायची आहे. त्यामुळे त्या खुर्चीवर मी बसलो, तर काहीतरी चुकलंय, असा त्याचा अर्थ होत नाही”, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर त्यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे बसले असतानाचा फोटो राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी ट्वीट केला होता. “हा फोटो अतिशय जबाबदार व्यक्तीने मला पाठवला आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातला हा फोटो आहे. तिथे मुख्यमंत्री अधिकाऱ्यांच्या बैठका घेतात. अशा ठिकाणी त्यांचे सुपुत्र बसले आहेत. आम्ही त्यांना सुपर सीएम झाल्याच्या शुभेच्छाही दिल्या आहेत”, असं रविकांत वरपे म्हणाले.