शाहरुखच्या ‘मन्नत’मध्ये दोन अज्ञात तरुणांची एंट्री; नेमके काय घडले?

मुंबई | जगभरातील चाहते शाहरुख खानला (Shah Rukh Khan) भेटण्यासाठी मुंबईला येतात. शाहरुखचा ‘मन्नत’ (Mannat) बंगला हा त्याच्या चाहत्यांसाठी नेहमीच आकर्षणाचं ठिकाण बनलं आहे. नुकतीच अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यात अशी घटना घडली, ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. मन्नतच्या सुरक्षेच्या बाबतीत घडलेली ही घटना आहे. त्यामुळे शाहरुख खानच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मन्नतच्या भिंतीवर चढून दोन तरुणांनी विना परवानगी अभिनेत्याच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला आहे.
बुधवारी रात्री दोन तरुणांनी ‘मन्नत’च्या भिंतीवरून उडी मारून घरात प्रवेश केला. या दोन्ही तरुणांना आता अटक करण्यात आली आहे. हे 2 तरुण गुजरातचे असल्याची माहिती मिळाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ‘मन्नत’मध्ये प्रवेश केल्यानंतर हे दोन तरुण बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावरही पोहोचले होते. मात्र तेव्हाच सुरक्षा रक्षकांच्या नजरा त्या तरुणांवर पडल्या. त्यांनी दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, मन्नतच्या बहिनीतीवर चढून घरात घुसण्याचा प्रयत्न करणारे दोन्ही तरुण शाहरुख खानचे मोठे चाहते आहेत. दोघेही त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले होते. सुरुवातीला मन्नतच्या सुरक्षा रक्षकांनी दोघांची विचारपूस केली आणि काही वेळाने त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. या दोघांचे वय 21 ते 25 वर्षांच्या दरम्यान आहे.
ज्यावेळी हे दोन तरुण ‘मन्नत’मध्ये दाखल झाले, त्यावेळी शाहरुख खान त्याच्या बंगल्यामध्ये उपस्थित नव्हता. हे दोन्ही तरुण गुजरातमधील सुरत येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. चौकशीत दोघांनी सांगितले की, ते शाहरुखला भेटायला गुजरातहून आले होते.