ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्ररणधुमाळी

एक पवार बंगळुरूकडे, दुसरे पवार दिल्लीकडे!

पुणे | NCP – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) सरळसरळ फूट पडल्याचे दर्शन महाराष्ट्रातील जनतेला आज (मंगळवारी) पुन्हा एकदा झाले. आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांची एकजूट करण्याचा प्रयत्न देशपातळीवर चालू आहे. याकरिता कर्नाटकातील बंगळुरू येथे २६ पक्षांची बैठक झाली. त्या बैठकीला उपस्थित राहाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) बंगळुरूकडे रवाना झाले आणि त्यांनी बैठकीत भाग घेतला. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सरकारला (एनडीए) पाठिंबा देणाऱ्यांची बैठक बोलावली होती.

त्या बैठकीत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) दिल्लीला रवाना झाले. त्यांनी पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकीत भाग घेतला. राष्ट्रवादीचे नेते दोन वेगवेगळ्या दिशांना निघून गेल्याने पक्षातील फूट महाराष्ट्रातील जनतेला पाहता आली. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध राहावी, शरद पवारांनी मार्गदर्शन करावे, अशा मागणीचा प्रस्ताव घेऊन अजित पवार यांनी सलग दोन दिवस आपल्या गटातील मंत्री आणि आमदारांसह शरद पवार गटाबरोबर बैठका घेतल्या होत्या. शरद पवार यांनी या प्रस्तावाला काडीचीही किंमत दिली नाही. मी भाजपबरोबर जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आणि ते बंगळुरू येथील बैठकीसाठी रवाना झाले. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या भेटीची मालिका का सुरू केली, याविषयी राजकीय विश्लेषकांचे मत असे आहे की, पक्षांतरबंदी कायद्याची कारवाई अजित पवार आणि त्यांच्या आठ सहकारी मंत्र्यांवर व्हावी.

दरम्यान, मोदींनी देशाचे नेतृत्व खंबीरपणे केले असून, त्यांच्या नेतृत्वाची अजूनही गरज असल्याचे अजित पवार म्हणाले. तर भाजपचे हिंदुत्व द्वेषमूलक आणि जातीजातीत भेद करणारे विषारी असल्याचे शरद पवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये