एकनाथ शिंदेंनी सांगितलं रहस्य; म्हणाले, “लोकांची काम करावी लागतील, नाहीतर लोक म्हणतील…”

मुंबई : मुंबईत आयोजित ‘सकाळ’ सन्मान सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, लोकांचा गराडा त्यांची कामं हेच माझं टॉनिक आणि ऊर्जा आहे. लोकांची कामे करावी लागणार आहेत, नाहीतर मुख्यमंत्री बदलला असे लोक म्हणतील. असं प्रतिपादन त्यांनी केलं.
दरम्यान, यावेळी संपादक राहुल गडपाले यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सरकार स्थापनेतील घडामोडी ते मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या कामकाजाचा आढावा मांडला. यावेळी शिंदे म्हणाले की, याआधी सत्तांतराचा प्रकार झाला तेव्हा मी त्या तीन दिवसांपैकी एक दिवस एक मिनिटही झोपलो नव्हतो. सध्या कामाचा नक्कीच भार आहे. लोकांना भेटणे, प्रशासकीय कामे आणि विभागाच्या मीटिंग असतात. जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे झोप कमी मिळते.
पुढे ते म्हणाले, आगामी दोन वर्षात मुंबईत एकही खड्डा दिसणार नाही. मुंबईत जगभरातील लोक येतात. मुंबई फायनान्शिअल हब आहे. मुंबई जशी आहे, तशी लोकांना देण्याचे काम आम्ही करतो आहोत. मुंबईकरांना आगामी दोन वर्षात खड्डेमुक्त रस्ते देणार. सध्या ४०० किमी सीसी रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. आगामी काळात आणखी ४०० किमीचे खड्डेमुक्त रस्ते मुंबईकरांना देण्यात येतील.”
या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सकाळ सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुढे बोलतांना शिंदे म्हणाले, सध्या मुंबईत हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ७० दवाखाने सुरू झालेत. आगामी काळात आणखी १५० दवाखाने मुंबईकरांच्या घराजवळ सुविधा म्हणून उपलब्ध होणार आहेत. त्यामध्ये सर्व आरोग्याच्या सुविधा मुंबईकरांना मोफत मिळणार आहेत.