शिव ठाकरेचा ‘खतरों के खिलाडी 13’ मधील प्रवास संपला? रोहित शेट्टी म्हणाला…

मुंबई | Shiv Thakare – सध्या ‘खतरों के खिलाडी 13’ (Khatron Ke Khiladi 13) हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. तसंच खतरों के खिलाडीच्या यंदाच्या पर्वात छोट्या पडद्यावरील अनेक कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. यामध्ये मराठमोळा शिव ठाकरे (Shiv Thakare) देखील सहभागी झाला आहे. पण शिवचा या पर्वातील प्रवास संपल्याच्या चर्चा सुरू आहेत.
‘बिग बॉस 16’ चा पहिला रनर अप ठरलेल्या शिव ठाकरेचा ‘खतरों के खिलाडी 13’ मधील प्रवास संपल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण रोहित शेट्टीने नेहमीप्रमाणे हॅप्पी एंडींग करत शिव ठाकरे हा खेळ सोडणार नसल्याचं सांगतो. त्यामुळे आता शिवच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
शिव आणि ऐश्वर्या हे दोघं एलिमिनेशन राऊंडमध्ये अडकले होते. त्यामुळे या दोघांमध्ये एक टास्क पार पडला. हा टास्क ऐश्वर्या आणि शिव दोघंही चांगले खेळले. पण शिवला हा टास्क पूर्ण करण्यासाठी ऐश्वर्यापेक्षा जास्त वेळ लागल्यामुळे त्याचा या कार्यक्रमातील प्रवास संपला असल्याचं बोललं जात होतं. मात्र, रोहित शेट्टी हा आठवडा नॉन-एलिमिनेशन असल्याचं सांगतो आणि शिव ठाकरे सुरक्षित होतो. त्यामुळे आता शिव या शो मधून बाहेर पडलेला नसून त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.