इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव थाटात साजरा
आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या (इस्कॉन) पुण्यातील कात्रज कोंढवा रस्ता येथील मंदिर ; जन्माष्टमी निमित्त सुमारे ५००० परिवारांनी केला भगवान श्रीकृष्णाला अभिषेक
राधे कृष्ण गोपाल कृष्ण… च्या जयघोषात आचार्य प्रभुपाद स्थापित आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या (इस्कॉन) पुण्यातील कात्रज कोंढवा रस्ता येथील मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रत्नजडीत वस्त्रालंकारानी सजलेल्या राधाकृष्णाचे रुप पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. फुलांनी सजविलेल्या पाळण्यातील बालकृष्णाला पाळणा देत भाविकांनी जन्माष्टमी उत्सव थाटात साजरा केला.
मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू, रेवतीपती प्रभू, जयदेव प्रभू या मंदिराच्या वरिष्ठ भक्त मंडळींसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. जन्माष्टमी निमित्त सुमारे ५००० परिवारांनी भगवंतांना अभिषेक केला.
जवळपास दोन लाख भाविकांनी राधाकृष्णाचे दर्शन घेतले. खासदार मेधा कुलकर्णी, आमदार योगेश टिळेकर, उल्हास पवार यांनी देखील दर्शन घेतले. अभिषेक हॉल मध्ये नित्योत्सवावर आधारित सुंदर देखावे निर्माण केले होते. वर्षभर इस्कॉन मंदिरांमध्ये होणाऱ्या निरनिराळ्या उत्सवांचे प्रतिबिंब ह्या नित्योत्सवात दिसत होते.
भगवान राधा कृष्णाचे आजचे वस्त्र नवरत्न ह्या कल्पनेवर आधारित होते. वेगवेगळ्या रत्नांनी आणि मौल्यवान खड्यांनी वस्त्र आभूषित केले होते. रात्री ९.३० वाजता भगवंतांना हरे-कृष्ण महामंत्राच्या जयघोषात ७५ कलशांमधून मंदिरातील भक्तवृंदातर्फे महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर भगवंतांना २५० प्रकारचे नैवेद्य दाखवून बरोबर रात्री १२ वाजता आरती करण्यात आली, अशी माहिती अध्यक्ष राधेश्याम प्रभू आणि प्रवक्ते जनार्दन चितोडे दिली. उपाध्यक्ष संजय भोसले यांनी जन्माष्टमी महोत्सवाचे आध्यात्मिक तसेच सांस्कृतिक महत्त्व आणि इस्कॉन संस्थेच्या जगभरातील उपक्रमांबद्दल सांगितले.
मंदिरामध्ये जन्माष्टमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसांच्या ‘कृष्णसमर्पण’ सांस्कृतिक महोत्सवाचा आज समारोप होता. महोत्सवात देशभरातून १००० कलावंत, २०० बालकलाकार आणि ५० संस्था यांनी शास्त्रीय नृत्य, गायन, नाट्य, वादन करून त्यांची कला भगवंतांना समर्पित केली. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त मंदिरातील तिन्ही गाभाऱ्यातील श्री श्री राधा-वृंदावन चंद्र, जगन्नाथ-बलदेव-सुभद्रा आणि गौर-निताई यांच्या विग्रहांना आकर्षक वस्त्र-आभूषणांनी सजविण्यात आले होते. याच मंदिराच्या आवारात श्री बालाजी चे सुंदर मंदिर आहे. या सर्व मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.