बाबा सिद्दिकींच्या हत्येप्रकरणी चौथ्या संशयिताला अटक

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी हरिशकुमार बालकराम (वय २३) याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. हरिशकुमार हा बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला चौथा संशयित आहे. हरीशकुमार बालकराम हा पुण्यात स्क्रॅप डीलर म्हणून काम करत होता. त्याला उत्तर प्रदेशातील बहराइचमधून पैशांचा पुरवठा आणि लॉजिस्टिक्सची व्यवस्था केल्याबद्दल अटक केली आहे.
बाबा सिद्दिकी यांची गेल्या शनिवारी रात्री वांद्र्यात खेरवाडी सिग्नलवर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींनी ते लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा दावा केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी रविवारी रात्री उशिरा पुण्यातून प्रवीण लोणकर याला अटक केली होती. त्याला न्यायालयाने २१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात अटक झालेला प्रवीण हा तिसरा आरोपी असून त्याच्यासह त्याचा भाऊ शुभम लोणकरने या हत्येसाठी शस्त्रे पुरविल्याचा आरोप आहे.
बिश्नोई गॅंगनेच घडवून आणली हत्या
या गुन्ह्यात बिश्नोई गॅंगचा सहभाग असल्याचा दावा सरकारी वकिलांनी दावा केला. त्यामुळे ही हत्या बिश्नोई गॅंगनेच घडवून आणल्याचे स्पष्ट झाले आहे. या हत्याकांडातील गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप यांना आधीच बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यांच्या चौकशीत शिवकुमार गौतम ऊर्फ शिवा, मोहम्मद झिशान अख्तर, शुभम लोणकर, प्रवीण लोणकर ही अन्य आरोपींची नावे समोर आली होती. लोणकर बंधू पुण्यात राहात असल्याने गुन्हे शाखेचे एक पथक पुण्याला गेले होते. रविवारी रात्री उशिरा प्रवीण याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.