कोथरूडच्या मुख्य रस्त्यावर वाहतेय दुर्गंधीयुक्त गटार : दादांनी झगमगटाखालील अंधारही पहावा
पुणे शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या आणि सरकारमधील एक वजनदार मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांचे होमपीच असलेल्या कोथरूड मधील उच्चभ्रू आणि सर्वात प्रतिष्ठित असलेल्या करिष्मा सोसायटी जवळील रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून एक दुर्गंधीयुक्त गटार चक्क रस्त्यावरून वाहत आहे. सध्या महापालिका चे सदस्य नसल्यामुळे याची जबाबदारी नेमकेपणाने घेण्यास कोणी तयार नाही. भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते आणि थेट मंत्र्यांपर्यंत त्याच्या तक्रारी दिल्या आहेत .
या परिसरात श्रीमंत आणि अति श्रीमंत रहिवाशांची वस्ती आहे असे मानले जाते. पुण्याचे दोन खासदार , केंद्रीय मंत्री, राज्याचे मंत्री , कोथरूडमध्ये डझनभर असलेले भावी नगरसेवक , आमदार – खासदारांचे कार्यकर्ते या सर्वांचीच या रस्त्यावरून दिवसभर वर्दळ असते . परंतु त्यांच्या एअर कंडीशन गाड्यांमध्ये याची दुर्गंधी कदाचित कधी पोहोचली नसेल . मात्र येथील प्रतिष्ठितांना , व्यावसायिकांना आणि सर्वसामान्य नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून नाकाला रुमाल लावून या परिसरातून फिरावे लागत आहेत.
उच्चभ्रू वर्गाचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण म्हणजे येथील वाडेश्वर. या वाडेश्वरच्या प्रवेशद्वारातच ड्रेनेजची ही गटार वाहत आहे. अनेक मंत्री , आमदार आणि प्रशासकीय अधिकारी राहत असलेल्या करिष्मा या बिल्डिंगच्या ड्रेनेजचे हे पाणी आहे. त्याच बिल्डिंगच्या दोन क्रमांकाच्या गेट पासून फुटलेले हे ट्रेनने खाली नेचर वॉक , त्यापुढे वाडेश्वर , त्यापुढे जोशी रेल्वे अमेचीआर इथपर्यंत येऊन एस्टॅलीकाच्या लेनमध्ये दुसऱ्या ड्रेनेज मध्ये जाते.त्यामुळे या परिसरामध्ये कायम दुर्गंधी दिसून येते तसेच दिवसभर गटारीचे हे पाणी वाहत असल्याने ही सर्व दुकाने आणि सोसायटी ओलांडूनच लोकांना ये – जा करावी लागते.या भागांमध्ये जोशी यांचे रेल्वे म्युझियम आहे येथे सातत्याने पर्यटक भेट देत असतात . परंतु या पर्यटकांनाही याच दुर्गंधीयुक्त पाण्याचा त्रास सोसावा लागतो.
नेचर वॉक नावाचे एक सभागृह आहे . येथे सातत्याने कार्यक्रम होत असतात . मागील आठवड्यात येथे अमृत या महामंडळाची माहिती देण्याबाबत शासकीय कार्यक्रम झाला होता . त्याचवेळी येथे सामाजिक कार्यकर्ते संदीप खर्डेकर यांच्या निदर्शनास लोकांनी ही गोष्ट आणून दिली. त्यांनी तात्काळ महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलावून दुरुस्ती करायला सांगितले.
परंतु आजपर्यंत ही गटारगंगा अशीच वाहत आहे.
येथील वाडेश्वर मध्ये अनेकदा लेखक , पत्रकार , संपादक, प्रतिथयश उद्योजक यांची मैफिल जमते. यातील अनेक घटकांनी तक्रारी करून देखील आणि वाडेश्वरच्या व्यवस्थापन देखील याबद्दल पाठपुरावा करून देखील ही गटार थांबण्याचे नाव घेत नाही . शेजारीच करिष्मा च्या खालील खाऊ गल्ली आहे तेथे स्टारबक्स सारखे कॉफी शॉप आहेत, पुढे थोडे अंतरावर कोथरूड सिटी प्राईड आहे . पलेदियम , स्वप्नशिल्प , नव्याने उभारलेले गोखले मॉल साठी याच रस्त्यावरून पुढे जावे लागते.
गणेशोत्सवाच्या या कार्य काळामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुमारे 100 हून अधिक कार्यक्रम या परिसरात केले . त्यांचा ताफा देखील दिवसातून किमान तीन ते चार वेळेला याच रस्त्यावरून जातो , अशा या प्रतिष्ठित , महत्त्वाच्या रस्त्यावर तरी स्वच्छता राखणे आणि किमान स्वच्छ व दुर्गंधी मुक्त परिसरासारख्या किमान मूलभूत सुविधा त्यांना पुरविणे हे महापालिका आणि लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. हे काम मंत्र्यांचे नाही परंतु सध्या नगरसेवक अस्तित्वात नसल्याने आणि भाजप कार्यकर्ते केवळ शोबाजीत दंग असल्याने ही जबाबदारी आता चंद्रकांत दादांनीच घ्यावी , अशी अपेक्षा येथील नागरिक व्यक्त करत आहेत. याबाबत काहींनी चंद्रकांत दादांची भेट घेण्याचे प्रयत्न केला परंतु त्यांच्या सचिवांनी त्यांना वेळ दिली नसल्याचे समजते . सांस्कृतिक कार्यक्रम, जाहिराती , बॅनर्स , निशुल्क वाटपाच्या मोहिमा , झगमगाट यावर कोट्यावधी रुपये खर्च करणाऱ्या दादांनी या दिव्याखालच्या अंधार देखील पहावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे .