चालू नाटक थांबवत भरत जाधवांनी लावला थेट महापौरांना फोन त्यानंतर…

मुंबई | अनेक मराठी प्रसिद्ध कलाकारांनी रंगमंचावरुन स्वत:ची विशेष ओळख निर्माण केली होती. त्यामधीलच एक म्हणजे अभिनेता भरत जाधव. गेल्या अनेक वर्षांपासून भरत जाधव रंगमंचावर ‘सही रे सही’ या नाटकाचे प्रयोग करत आहे. आजही या नाटकाला प्रेक्षक आवडीने आणि उत्साहाने हजेरी लावताना दिसतात. मात्र यावेळी नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी असं काही घडलं की फक्त प्रेक्षकच नाही तर भरतनेही खंत व्यक्त केली आहे.
भरत जाधवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून भरत जाधवने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये आपल्या चाहत्यांच्या काही ट्वीट्सचे स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. त्यांचा एक चाहता म्हणाला, “स्वानुभव भरत जाधव यांच्या ‘सही रे सही’च्या प्रयोगाला गेलो असताना, हॉलमधले काही पंखे बंद होते. त्यात एसी पूर्णपणे ठप्प होता.
आम्ही प्रेक्षक बोंब मारायला लागलो. त्यावेळी नाटकमध्येच थांबवून भरत जाधवांनी महापौरांना फोन करुन जोपर्यंत पंखे नीट करणार नाही, प्रयोग असाच थांबून राहील असं सांगितलं. अक्षरशः नाटक दीड तास थांबलं होतं. त्या दीड तासात भरत जाधव आमच्यासोबत बोलत होते. ते म्हणाले, तुम्ही प्रेक्षक अंधारात बसला आहात. इथे आमच्या स्टेजवर चेहऱ्यावर हजार-हजार वॅटचे लाईट आहेत. आम्हीसुद्धा घामाने बेजार झालो आहोत. तेव्हा स्टेजवर असणाऱ्यांची खरी दुरावस्था कळाली.” हे ट्वीट शेअर करताना भरत जाधव म्हणाला, ‘नाट्यगृह व्यवस्थापन हा एक पीएचडीचा स्वतंत्र विषय होऊ शकतो.

दरम्यान, भरत जाधवने नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. तसंच भरत जाधव सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असतो. तसंच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तो नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहतो.