खाकी वर्दीतले सौंदर्य
बुद्धी आणि शक्ती या दोन्ही स्त्रीरूप देवता आहेत पण या दोन्हींचा संगम होत असताना तेथे सौंदर्यही प्रकटले तर वेगळा आविष्कार झाल्याशिवाय राहणार नाही, हाच आविष्कार पल्लवी जाधव यांच्या रुपाने समोर आला आहे. अत्यंत खडतर परिश्रमातून एमपीएससीची परीक्षा देत असताना अपयशानंतर फडकलेली विजयाची पताका आणि त्याच वेळेला सौंदर्यवतीचा किताब हे त्यांच्या बुद्धी, शक्ती आणि सुंदरतेचा त्रिवेणी संगम ठरला आहे .
SUCCESS STORY | पीएसआय पल्लवी जाधव (PSI PALLAVI JADHAV) या मूळ कन्नड तालुक्यातील रेल या गावातील आहेत. त्यांचे प्राथमिक आणि उच्च शिक्षण गावाकडेच पूर्ण झाले. त्यानंतर आपले ध्येय साधण्यासाठी त्यांनी औरंगाबाद गाठले आणि स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे कमी वेळात यश साध्य करणे त्यांना अत्यंत गरजेचे होते. त्यासोबतच त्यांना काहीतरी काम करून पैसे कमवायचे होते आणि त्यांना साथ मिळाली ती ‘कमवा आणि शिका’ या योजनेची. त्यातून त्यांनी यश मिळविलेही.
कुठलेही खासगी क्लास न लावता त्यांनी सेल्फ स्टडी केली आणि आज पीएसआय पद मिळविले. त्यानंतर त्यांनी स्वप्न बाळगले होते की, ‘सौंदर्यवती’ म्हणून नावलौकिक मिळविण्याचे आणि तोही त्यांनी मिळविला. आज देशभरात त्यांचे नाव लोक अभिमानाने घेत आहेत. अशा कन्नड येथील संघर्षकन्येचा खडतर प्रवास दै. ‘राष्ट्रसंचार’च्या (RASHTRASANCHAR) माध्यमातून पाहणार आहोत.
एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंब. कुटुंबाचे उत्पन्न जेमतेम. मात्र जिद्द, चिकाटी आणि सातत्य या जोरावर आत्मविश्वासाने पल्लवी जाधव यांनी पीएसआय बनण्याचे आपले स्वप्न साकार केले. दहावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेणारी घरातली पहिली मुलगी, पदवीचे शिक्षण घेणारी गावातली पहिली मुलगी आणि पीएसआय होणारीही गावातली पहिलीच मुलगी, असा प्रवास खडतर मार्गावरून मोठ्या जिद्दीने करणार्या पल्लवी जाधव यांची कथा ही सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.
एमपीएससीची परीक्षा हे आव्हान तर होतेच, मात्र त्याही आधी पल्लवी यांच्यासमोर शिक्षण पूर्ण करण्याचे आव्हान होते. ज्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि त्यांच्या आईवडिलांनी त्यांना पुरेपूर सोबत केली. वयाच्या १५-१६ व्या वर्षीच लग्न करण्याची प्रथा असणार्या गावात दहावीनंतर शिक्षण घेणे म्हणजे जिकिरीचेच काम आणि त्यातही घरची परिस्थिती हलाखीची. मात्र हार न मानता आठवडाभर आई-वडिलांना शेतातल्या कामात मदत करून एकच दिवस महाविद्यालयात हजेरी लावत पल्लवी यांनी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मात्र आई-वडिलांनी त्यांच्या लग्नाचा विचार सुरू केला.
तोपर्यंत आपल्याला काय करायचे आहे याची कल्पना त्यांनाही नव्हती. आईबरोबर एका लग्नात गेल्या असता, एका नातेवाइकांनी एमपीएससी परीक्षेबद्दल मार्गदर्शन केले, आई तर तयार झाली; मात्र वडिलांना तयार करणे हे आव्हान होते. वडीलही तयार झाले, तर पैशाचा प्रश्न होता. मग बचत गटातून व्याजाने ५ हजार रुपये कर्ज घेऊन पल्लवी यांचा एमपीएससीचा प्रवास सुरू झाला. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात त्यांनी एमएला प्रवेश घेतला.
आई-वडिलांवर आपल्या खर्चाचा बोजा पडू नये म्हणून कमवा आणि शिका योजनेत प्रवेश घेतला आणि अभ्यासाला सुरुवात केली. खाकी वर्दीचे आकर्षण त्यांना पीएसआय पदाकडे खेचत होते. पहिल्या प्रयत्नात केंद्रीय पीएसआयसाठी त्या पास झाल्या. मात्र फिजिकलमध्ये त्यांना अपयश आले, पण प्रयत्न सुरू ठेवले. नंतर दुसर्या प्रयत्नात घवघवीत यश संपादन केले. त्यांच्या या कठोर परिश्रमाचे सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सलाम त्यांच्या कार्याला…
सलाम त्यांच्या कर्तृत्वाला!