भाजी विक्रेत्याच्या मुलाची प्रतिकूल परिस्थितीत यशस्वी कामगिरी…

सासवड : मूळचे मनमाड येथील रहिवासी असलेल्या व गेल्या आठ वर्षांहून अधिक काळ उदरनिर्वाहासाठी सासवडला स्थायिक झालेल्या संजय देवीप्रसाद तिवारी व सविता संजय तिवारी या भाजी विक्रेत्याचा मुलगा मनोज तिवारी याने नुकतीच कायद्याची बीए. एलएल. बी. ही पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मनोज तिवारी याने मिळवलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठामधून तिवारी याने ही पदवी प्राप्त केली आहे.
मनोज याचे आई-वडील सन २०१४ मध्ये सासवड येथे कामाधंद्यासाठी आले… सुरुवातीला संजय तिवारी यांनी सासवड न्यायालय परिसरात वेगवेगळी कामे तर सविता यांनी हॉटेलमध्ये पोळ्या लाटून आपला प्रपंच चालवला. मध्यंतरी आलेल्या कोरोना संकटात दोघांची कामे गेली. या स्थितीत त्यांनी सासवड परिसरात भाजी विक्री व्यवसाय सुरू केला व या खडतर परिस्थितीत मुलगा मनोज व दुसरा मुलगा अमोल यांचे शिक्षण सुरू ठेवले. मनोज याचे महाविद्यालयीन शिक्षण सासवड येथील वाघि महाविद्यालयात झाले असून, अमोल पुरंदर विद्यालयात बारावी शिकत आहे. तिवारी दाम्पत्य आजही रिक्षामधून भाजी विक्री व्यवसाय करीत आहे.
आई-वडील यांच्या कष्टाची जाणीव व व्यवसायाने वकील असलेल्या आत्या सरला तिवारी यांच्या विशेष पाठिंब्याने आपण पदवी प्राप्त करू शकलो व पुढे एलएल.एम. करणार असल्याचे मनोज याने सांगितले.