विजय मल्ल्या यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका; ‘चार महिन्यांची शिक्षा आणि…’

उद्योगपती विजय मल्ल्या यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. न्यायालयीन निर्देशांचे पालन न केल्याप्रकरणी त्यांना 4 महिन्यांची शिक्षा आणि २००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याचबरोबर परदेशात पाठवलेले ४० मिलियन डॉलर्स महिन्याभराच्या आत जमा करण्याचे आदेशही दिले आहेत.
२००० रुपये दंड न भरल्यास विजय मल्ल्या यांना दोन महिन्यांची अधिक शिक्षा भोगावी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयात जस्टीस यू यू ललित, जस्टीस एस रवींद्र भट्ट आणि जस्टीस सुधांशू लुधिया यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
2017 च्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने विजय मल्ल्या यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. मल्ल्या यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या 2013 च्या आदेशांचे उल्लंघन केले असल्याचे न्यायालयाने नमूद केले होते. २०१३ च्या आदेशानुसार “या याचिकांमधील पुढील आदेश येईपर्यंत त्यांच्या मालकीच्या जंगम तसेच स्थावर मालमत्तेच्या संदर्भात तृतीय पक्ष अधिकार हस्तांतरित करणे, वेगळे करणे, विल्हेवाट लावणे किंवा निर्माण करणे” प्रतिबंधित केले होते.
मल्ल्या यांनी आपल्या संपत्तीची माहिती न देता बँकांकडून कोट्यावधी रुपयांचे कर्ज घेतले होते.