मुख्यमंत्रीसाहेब, लेट्स गेट सीरियस नाऊ…

लॉलीपॉप आंदोलन : खा. सुळेंची विनंती
पुणे : राज्यातील अडीच ते तीन लाख तरुणाच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तळेगाव येथील जागा वेदांत कंपनीने निश्चित केली होती ती कशामुळे गेली, याबाबत स्पष्टीकरण राज्य सरकारने द्यावे. ज्या पदावर ते बसले आहे त्या पदावर जबाबदारी घ्यावी लागते. मुख्यमंत्र्यांना माझी विनम्रपणे विनंती आहे यास गांभीर्याने घ्या. लेट्स गेट सीरियस नाऊ. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती यामुळे अडचणीत येऊ शकते. केवळ खुर्चीत बसणे, हार तुरे घेणे आणि सत्कार दौरे करणे म्हणजे सत्ता नसते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी लगावला.
गुजरातमधील वजनदार नेत्यांचा प्रभाव
केंद्र आणि राज्य सरकार केवळ जनतेस लॉलीपॉप दाखवत असून कोणत्याही आश्वासनांची पूर्तता करण्यात येत नाही. लहान मुलांना ज्या प्रकारे समजूत काढण्यासाठी आश्वासन दिले जाते तसे लॉलीपॉप सरकार जनतेस देत आहे. राज्याच्या हितासाठी सरकारने काम करणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारमध्ये गुजरातमधील वजनदार नेते असून आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी वेदांत प्रकल्प हलविण्यात आला आहे.
वेदांत व फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेलेला आहे. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्ही तुम्हाला याच्यापेक्षा मोठा प्रकल्प देऊ, अशा प्रकारचे लॉलीपॉप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेले आहे. या आश्वासनाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात बालगंधर्व रंगमंदिर जवळ झाशीचा पुतळा येथे ‘लॉलीपॉप आंदोलन’ करण्यात आले.
त्यावेळी त्या बोलत होत्या. नवीन विकास उद्योग माध्यमातून येत असतो. जी राज्यात गुंतवणूक आली आहे त्यातील गुंतवणूक जाणीवपूर्वक इतर राज्यांत वळवण्यात येत आहे. सर्व पक्षांनी कसा न्याय मिळेल, यादृष्टीने आगामी काळात प्रयत्न केले पाहिजे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लेखी पत्र पाठवून आम्ही त्यांना राज्यातील गुंतवणूक हलवण्यात येऊ नये, अशी मागणी करणार आहे. महाराष्ट्राला मेरीटवर जो प्रोजेक्ट मिळाला होता, तो गुजरातमध्ये नेण्यात आला, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. मुख्यमंत्र्यांनीही हे विषय जरा गांभीर्याने घेतले पाहिजे, असेही यावेळी त्या म्हणाल्या. यावेळी मोठ्या संख्येने मोर्चामध्ये पदाधिकारी उपस्थित होते.