काश्मीरकडे एक हजार तिरंगी झेंडे रवाना

परिवर्तन संस्थेतर्फे २५ वर्षांपासून उपक्रम सुरू
पुणे : देशाच्या उत्तरेकडील काश्मीर हा अतिशय दुर्गम भाग आहे. केवळ राष्ट्रीयच नाही, तर आंतरराष्ट्रीय आयाम या भागाला आहे. राष्ट्रीय एकात्मतेशी निगडित विषय असला, तर काश्मीर हे कायमच केंद्रस्थानी येते, असे मत काश्मीरमधील आयएएस अधिकारी डॉ. सागर डोईफोडे यांनी व्यक्त केले.
परिवर्तन संस्थेतर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त काश्मीरमधील दुर्गम गावांमध्ये १ हजार तिरंगी झेंडे पाठविण्यात आले. शिवाजीनगर येथील संचेती हॉस्पिटलमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते सुपूर्द करण्यात आले. परिवर्तन संस्था ही १९८० पासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. सन १९९७ मध्ये देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सुवर्णमहोत्सवानिमित्त संस्थेने तिरंगावाटपाचा कार्यक्रम सुरू केला होता. तिरंगावाटपाचा रौप्यमहोत्सवानिमित्त काश्मीर येथे एक हजार तिरंगा झेंडे पाठविण्यात आले. परिवर्तन संस्थेने गेल्या पंचवीस वर्षांमध्ये वेगवेगळ्या शाळा, महाविद्यालय आणि शासकीय कार्यालयांमधून झेंडे दिले आहेत. अनेक शासकीय कार्यालयात टेबल झेंडे दिले आहेत. देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त हा उपक्रम अत्यंत अभिमानास्पद आहे.
काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो याही पुढे राहणारच आहे. अशा प्रकारे भारताच्या इतर भागांतूनही काश्मीरशी संबंध प्रस्थापित झाल्यास देश मजबूत होण्यास मदत होईल आणि हे कार्य परिवर्तन संस्था करते आहे, हे अतिशय महत्त्वाचे व योग्य कार्य संस्था करीत आहे. यावेळी त्यांनी डॉ. सागर डोईफोडे या मराठी तरुणाचाही सन्मान केला, कारण महाराष्ट्रीय तरुण काश्मीरमध्ये उत्तम कार्य करीत आहे, याचा मला मराठी म्हणून अभिमान आहे.
— डॉ. के. एच. संचेती
डॉ. सागर डोईफोडे म्हणाले, काश्मीर आपल्या देशातील अतिशय संवेदनशील भाग आहे. त्या भागात पुण्यातून १ हजार ध्वज पाठविण्यात येत आहेत, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. भारतीय ध्वज हे राष्ट्रीय प्रतीक आहे. ध्वजातील रंगांप्रमाणे आपण प्रत्येक भारतीय एकमेकांशी कसे जोडले जातो, हे महत्त्वाचे आहे.