शेतकरी संकटात असताना आमदारांची ‘अशी’ वागणूक लाजिरवाणी; अजित पवारांचे खडेबोल

मुंबई – vidhansabha monsoon sassion : आज ( १८ ऑगस्ट) विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अधिवेशनादरम्यान सर्वच आमदारांकडून शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने शेतकऱ्याला संकटात आणले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने मदत करण्याची घोषणा केली आहे. मात्र, सरकारची मदत तुटपुंजी असल्याचा आरोप विधानसभा विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीच्या निमित्ताने पाहणीसाठी दौऱ्यावर जाणाऱ्या नेत्यांवरही निशाना साधला आहे.
“अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांची गंभीर अवस्था आहे. अनेक भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील जमीन खरडून वाहून गेली आहे. त्या जमीनीत तीन – चार वर्षे काहीही पिकू शकणार नाही अशी अवस्था आहे. त्याठिकाणी एनडीआरएफचे नियम काहीही करू शकत नाहीत. सरकारने एनडीआरएफच्या नियमांच्या दुप्पट मदत करण्याचा दावा केला आहे. पण ती मदत खूपच तुटपुंजी आहे. शेतकऱ्यांचा संपूर्ण खर्च हा एकराला ११ ते साडेअकरा हजार येतो मात्र सरकारकडून हेक्टरी फक्त १३,६०० रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यात शेतकऱ्यांनी काय करावं?” असा सवाल अजित पवारांनी भाषणात उपस्थित केला आहे.
अशी वागणूक लाजिरवाणी
“राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आहे. शेतकऱ्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा वेळी सरकारमधील काही व्यक्ती दौऱ्यावर जातात. तिथे क्रेनने त्यांचा हार घालून सत्कार केला जातो. एकीकडे शेतकरी आत्महत्या करत असताना आणि दुसरीकडे आपण काय करत आहोत? ही फार लाजिरवाणी बाब आहे. याबाबत सरकारने आदेश काढायला हवेत. राज्यात अशी बिकट स्थिती असताना कोणीही असे सत्कार स्वीकारू नयेत.” असं अजित पवार म्हणाले.