“…म्हणून आम्हाला सावध राहावं लागणार”, शिवसेना पक्षफुटीनंतर भाजपच्या मित्रपक्षातील नेत्याचं मोठं विधान

मुंबई : (Mahadev Jankar On Devendra Fadnavis) सात महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात मोठा सत्तासंघर्ष झाला आणि शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेच्या ४० आमदारांनी भाजपबरोबर जात सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर आता ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. अशातच राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी सावध भूमिका व्यक्त केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना महादेव जानकर म्हणाले की, “मंत्री असताना मी सांगायचो, काँग्रेस आणि भाजप दोन्ही फसवे पक्ष आहेत. आम्ही बाहुले नाही, तर पक्षाचे मालक आहोत. जसे, मोठा मासा छोट्या माशाला खातो, तसं आम्हाला ते खात आहेत. त्यामुळे आम्हाला सावध राहावे लागणार आहे. काँग्रेसबरोबर गेलेल्या पक्षांची अवस्था बघा. आता काँग्रेसचेच भाजप झालं आहे,” असा हल्लाबोल महादेव जानकर यांनी केला.
शिवसेना पक्षाबाबत बोलताना जानकर यांनी सांगितलं की, “एखादं मंडळ काढणं सोपं असतं. पण, पक्ष काढणे खूप अवघड आहे. पक्ष काढणाऱ्याच्या हृदयाला काय वेदना होतात हे त्यालाच माहिती. बाळंतपणीला जी वेदना होते, ते ज्यांचं बाळंतपण होत नाही त्यांनी बोलू नये. त्या वेदनेशी सहमत आहे.”
२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबद्दल बोलताना जानकर म्हणाले की, “निवडणुकीच्या दृष्टीने ९० हजार पोलिंग बूथ आम्ही तयार करत आहे. ४० ते ४२ टक्के काम पूर्ण झालं आहे. महाराष्ट्रातील सर्व ४८ जागा लढण्याची आमची तयारी आहे. परभणी, बारामती, माढा, मिर्जापूर या चार मतदारसंघावर लक्ष केलं आहे. या चार मतदारसंघापैकी दोन जागी विजय निश्चित आहे,” असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला.