हॅन्डलूम प्रदर्शन पुणेकरांसाठी ३ जुलैपर्यंत खुले

पुणे ः ‘आझादी का अमृतमहोत्सव’ अंतर्गत विणकर कामगारांना, हातमाग व्यावसायिकांना आणि हातमागावरील कपड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन सिल्क गॅलरीतर्फे पुण्यात पहिल्यांदाच भव्य हातमाग प्रदर्शनाचे (बिगेस्ट हॅन्डलूम एक्झिबिशन) आयोजन केले आहे. येत्या ३ जुलै २०२२ पर्यंत सकाळी ११ ते ८ या वेळेत सिद्धी बँक्वेट, डीपी रस्ता, पुणे येथे हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले आहे.
हातमाग विकास आयुक्तालय, इंडिया हॅन्डलूम, हॅन्डलूम मार्क यांच्या सहकार्याने एकाच छताखाली हे प्रदर्शन होत आहे. महाराष्ट्रासह अन्य १४ राज्यांतील ६० पेक्षा अधिक हातमाग व्यावसायिक व विणकरांनी यात सहभाग घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सेंट्रल सिल्क बोर्डाचे उपसंचालक (नि.) श्रीनिवास राव, सीईओ विनयकुमार व अनघा घैसास यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
ग्राहकांना सिल्क कपड्याबाबत जागरूक करण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल. यामध्ये देशाच्या विविध भागात असलेली, विशेषतः हातमाग, कॉटन, सिल्क, लिनन या कपड्यांच्या माध्यमातून पुणेकरांसमोर ठेवण्याचा प्रयत्न आहे. अतिशय सुंदर कलाकुसर, नक्षी आणि गुणवत्तापूर्ण कपडे उपलब्ध आहेत. महिलांसाठी ही एक अनोखी पर्वणी आहे.
_श्रीनिवास राव
श्रीनिवास राव म्हणाले, देशभरातील विणकरांची कलाकुसर प्रदर्शनाच्या माध्यमातून पुणेकरांसमोर मांडताना आम्हाला आनंद होत आहे. महिला वर्गाच्या सौंदर्यात आणि आकर्षणात भर घालणारे हे प्रदर्शन आहे. रेशमी वस्त्रांची फारशी ओळख ग्राहकांना नसते. त्याचा गैरफायदा घेत काही उत्पादक आणि व्यापारी बाजारात बनावट कपड्यांची विक्री करतात. हे टाळून ग्राहकांना शुद्ध आणि हाताने विणकाम केलेल्या साड्या, ड्रेस मटेरियल्स व अन्य कपडे या प्रदर्शनात उपलब्ध करून दिले आहेत.