‘फू बाई फू’ घेणार प्रेक्षकांचा निरोप, महिन्याभरात कार्यक्रम संपण्याचं ‘हे’ आहे कारण

मुंबई | Fu Bai Fu Programme – झी मराठी वाहिनीवरील ‘फू बाई फू’ (Fu Bai Fu) या कार्यक्रमाचं पहिलं पर्व चांगलंच गाजलं होतं. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतलं होतं. त्यानंतर आता या कार्यक्रमाचं दुसरं पर्व तब्बल 9 वर्षांनी सुरू झालं. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही आनंदाचं वातावरण होतं. मात्र, आता लवकरच हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
‘फू बाई फू’ हा कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. तसंच हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. लोकप्रिय असलेला हा कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू झाला होता. या नव्या पर्वात अनेक कलाकारही सहभागी झाले होते. मात्र महिन्याभरातच हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या कार्यक्रमाला हवा तसा टीआरपी मिळत नसल्यानं हा कार्यक्रम लवकरच बंद होणार असल्याचं बोललं जात आहे.
3 नोव्हेंबर 2022 रोजी ‘फू बाई फू’ हा कार्यक्रम सुरु झाला होता. विशेष म्हणजे या नव्या हंगामात ओंकार भोजने, भूषण कडू, सागर कारंडे, नेहा खान, पंढरीनाथ कांबळे, प्राजक्ता हनमकर, कमलाकर सातपुते, माधवी जुवेकर असे अनेक दिग्गज विनोदवीर सहभागी झाले होते. तसंच या कार्यक्रमात उमेश कामत आणि निर्मिती सामंत यांसारखे परिक्षकही होते. तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेत्री वैदही परशुरामी करत होती.