हाता-तोंडाशी आलेला घास नेला हिरावून

नाशिक : गेल्या आठवड्यापासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांना हवा असणारा पाऊस आता नकोसा झाला आहे. कारण सतत पडणाऱ्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. परिसरातील शेतकऱ्यांसह बहुतांश शेतकऱ्यांचे टोमॅटोचे पीक उत्तरा नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी खराब
झाले आहे.
हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इतर फळपिकेही धोक्यात आली आहेत. पिकांवर रोगांचे आक्रमण होत असल्याने महागडी औषध फवारणी करून शेतकरी वैतागले आहेत. जूनच्या प्रारंभापासूनच पावसाने दमदार सुरुवात केली होती. यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची जोरदार तयारी केली होती.
मका, बाजरी पिकांबरोबरच फळशेतीदेखील बहरली होती. मात्र, परतीच्या पावसाने शेती पिकांची नासाडी सुरू केली आहे. टोमॅटो, शिमला, कोबी, फ्लॉवर यासह इतर भाजीपाला पिकांची नासाडी होत आहे. तर अनेक ठिकाणी पिके वाहून गेली आहेत. फळवर्गीय पिकांची फुलकळी कुजून गेली आहे. अतिप्रमाणात पाऊस व पहाटे पडणाऱ्या धुक्यामुळे करपा व इतर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. खरीप हंगामातील पीक अंतिम टप्प्यात आहे. मात्र, परतीच्या पावसाने पिकांची नासाडी होत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.
मुसळधार पावसामुळे टोमॅटोवर काळे डाग पडत असून खराब टोमॅटो फेकून द्यावे लागत आहेत. झाडावर रोगराई पसरली असतानाच निसर्गाने हाताशी आलेला घास हिरावून घेतल्याने बळीराजा हतबल झाला आहे. सरकारने मदतीचा हात देण्याची गरज असल्याचे शेतकरी म्हणत आहेत.