पुणेराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने बेकायदेशीर काम

परवानगीविना मनमानी पद्धतीने काम

मांजरी : पुणे महानगर पालिकेच्या वतीने ११ गावांमध्ये १६७ किलोमीटर लांबीची मैलावाहिनी टाकणे, मांजरी बुद्रुक येथे ९३.५ एमएलडी क्षमतेचा मैला शुद्धीकरण प्रकल्प उभारणे या प्रकल्पांतर्गत सध्या मांजरी बुद्रुक येथील मुळा-मुठा नदी ते कालवा दरम्यानच्या चार ते पाच किलोमीटर अंतराच्या मैलावाहिनीचे काम सुरू आहे. समाविष्ट ११ गावांमधील मैलावाहिनी आणि मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांतर्गत महापालिकेने मांजरी बुद्रुक येथे मैलावाहिनीचे काम सुरू केले आहे.

परंतु हे काम आराखडा तयार करून न करता मनमानी पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. कोणत्याही प्रकारची कल्पना न देता महापालिका अधिकारी व ठेकेदार संगनमताने केवळ ठेकेदाराच्या मर्जीनुसार काम होत आहे, असा आरोप भापकरमळा येथील शेतकरी विश्वास भापकर यांनी केला आहे.

भापकरमळा येथे काम करीत असताना ही वाहिनी काही शेतकर्‍यांच्या खासगी जागेतून जात आहे. त्यासाठी आवश्यक ती परवानगी घेण्यात आली नसल्याचे शेतकरी विश्वास भापकर यांचे म्हणणे आहे. कोणत्याही प्रकारची कल्पना न देता हे काम सुरू असल्याने शेतकर्‍यांचे भविष्यात मोठे नुकसान होणार आहे.

त्यामुळे महापालिकेने आधी कामाचा आराखडा जाहीर करावा आणि त्यानुसार काम करावे, तसे काम करण्यास विरोध नसल्याचेही भापकर यांनी सांगितले. शाखा अभियंता गणेश पुरम याबाबत बोलताना म्हणाले, मुळा-मुठा नदी ते कालवा अशा चार ते पाच किलोमीटर अंतरावर या चार फूट व्यासाच्या मैलावाहिनीचे काम सध्या भापकर मळा येथे सुरू आहे. काम शासकीय जागेतून रस्त्याच्या कडेने करण्यात येत आहे.

शेजारील शेतकर्‍यांना तशी तोंडी कल्पना देण्यात आली असून, त्याबाबत पत्रही देण्यात येणार आहे. मैलावाहिनीचे काम नियमानुसार होत आहे. शेतकर्‍यांचे नुकसान करण्याचा कोणत्याही प्रकारचा हेतू नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये