“त्यांच्यावर अन्याय होतोय, हे…”, पंकजा मुंडेंना पक्षात घेण्याबाबत शिवसेनेचं सूचक विधान

मुंबई : (Sunil Shinde On Pankaja Munde) भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे राज्यातील पक्षनेतृत्त्वावर नाराज असल्याच्या अनेक रंगताना दिसून आल्या आहेत. त्यांनी पक्षात होणारी कोंडी अनेकदा पक्षश्रेष्ठींकडे बोलून दाखवली आहे. आता पुन्हा एकदा त्यांच्या नाराजीचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत येतो. दरम्यान, शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार सुनील शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. पंकजा मुंडेच्या नाराजीबद्दल बोलताना त्यांनी पंकजा मुंडे यांचं शिवसेनेत स्वागत आहे, असं म्हटलं आहे.
शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, “पंकजा मुंडे फार मोठ्या नेत्या आहेत. त्यांचा पक्ष मोठा आहे. त्यामुळे त्यांचं मत आणि त्यांच्या क्रिया-प्रतिक्रियेशी माझा काहीही संबंध नाही. पण पंकजा मुंडे भाजपच्या फार मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्यावर अन्याय होतोय, हे आम्हाला दिसतंय. मात्र, हा त्यांच्या पक्षांर्तगत विषयआहे. त्यामध्ये मी काहीही बोलणार नाही. पण त्यांच्या कर्तुत्वाला आम्ही नेहमीच सलाम करत राहू. पंकजा मुंडे यांचं शिवसेना पक्षात स्वागत आहे,” अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली.
दरम्यान, सुनील शिंदे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “देशातील सर्वोच्च न्यायालय, ईडी आणि सीबीआय यासारख्या स्वायत्त संस्था केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत आहेत. देश हुकूमशाही पद्धतीने चालवला जात आहे. देशातील प्रत्येक राज्यातील स्थानिक पक्ष उद्ध्वस्त करून लोकशाही तंत्र मिटवण्याचे कारस्थान भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकार करत आहे. शिवसैनिकांसाठी मातोश्री हे मंदिर आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच शिवसेनाप्रमुख आणि पक्षप्रमुख आहेत आणि राहतील,” असे प्रतिपादन शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी केलं.